Header Ads

Header ADS

शिंदे गटातील आणखी एका बंडखोराला शिवसेनेचा दणका -

 

Another-rebel-in-Shinde-group-hit-Shiv Sena

शिंदे गटातील आणखी एका बंडखोराला शिवसेनेचा दणका


लेवाजगत न्युज:-बंडखोरांनी अजूनही परत यावे, त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, असे आवाहन सातत्याने करणाऱ्या शिवसेनेने दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे गटातील (Eknath Shinde camp) बंडखोर आमदारांविरोधात कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या 'सामना'तून दररोज एक-एक पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली जात आहे. यामध्ये मंगळवारी आणखी एका बंडखोराची भर पडली. शिवसेनेकडून शिंदे गटातील बंडखोर आमदार रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांची पालघर जिल्हासंपर्क प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शाह यांचीही उचलबांगडी करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर ते सूरतमध्ये जाऊन बसले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी सूरतमधील ले मेरेडियन हॉटेलमध्ये मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना पाठवले होते. त्यावेळी रवींद्र फाटक यांनीच एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नंतर रवींद्र फाटक हेच शिंदे गटात सामील झाले होते. रवींद्र फाटक हे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन संतोष बांगर यांची हकालपट्टी केली होती. त्यापूर्वी सोलापूरच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून आमदार तानाजी सावंत यांची हकालपट्टी करण्यात आली होती. याशिवाय, शिवसेनेने कोकणातील आमदार उदय सामंत (MLA Uday Samant) यांच्या समर्थकांचीही पक्षातून हकालपट्टी केली आहे. उदय सामंत यांचे समर्थक असणारे उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेटये आणि युवा तालुका अधिकारी तुषार साळवी यांना पदावरून हटवण्यात आले होते.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून दररोज कोणाकोणाची हकालपट्टी झाली, याची माहिती प्रसिद्ध केली जात आहे. मात्र, बंडखोर आमदारांनी याविरोधात दंड थोपटायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कारवाईला थेट आव्हान दिले होते. मला हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही. मीच शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो आणि राहणार, असा पवित्रा संतोष बांगर (Santosh Banger) यांनी घेतला आहे. दोन तृतीयांश आमदार असलेला शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून माझ्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आमच्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) ५० जिल्हाप्रमुख आहेत, असे संतोष बांगर यांनी म्हटले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.