वारीहून परतताना भीषण अपघात, वळणावर टेम्पो उलटला, १० वारकरी जखमी
वारीहून परतताना भीषण अपघात, वळणावर टेम्पो उलटला, १० वारकरी जखमी
लेवाजगत न्युज सांगली:- आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. आणि टेम्पो उलटून घडलेल्या अपघातामध्ये दहा वारकरी जखमी झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या मनेराजुरी या ठिकाणी हा अपघात घडला आहे. जखमींना तातडीने सांगली आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे.
सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यातील भागाईवाडी व परिसरातील 60 वारकरी हे आषाढी वारी निमित्ताने पंढरपूर या ठिकाणी गेले होते.
आषाढी वारी संपल्यानंतर पुन्हा गावी परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला आहे. एका टेम्पो मधून हे सर्व वारकरी पंढरपूर येथून सकाळी निघाले, दुपारी तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथील पावर वस्तीजवळ पोहचला असता, वळण घेताना टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, आणि त्यानंतर टेम्पो हा रस्त्याकडेला पलटी झाला.
टेम्पोच्या आत बसलेले वारकरी हे एकमेकांच्या अंगावर पडले, त्याचबरोबर काही वारकरी हे गाडीतून बाहेर फेकली गेले, त्यामुळे दहा ते बारा वारकरी यामध्ये जखमी झाले आहेत. यामध्ये वयस्कर महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. घटनास्थळी तातडीने ग्रामस्थांनी धाव घेतली होती,
त्यानंतर रुग्णवाहिका आणि इतर वाहनातून जखमी वारकऱ्यांना सांगली, मिरज आणि तासगाव इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जात असताना कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकऱ्यांच्या दिंडीत कवठेमहांकाळ तालुक्यातल्या केरेवाडी या ठिकाणी जिप गाडी घुसल्याने अपघात घडला होता, ज्यामध्ये 17 वारकरी हे गंभीर जखमी झाले होते. त्यापाठोपाठ आणखी एक वारकऱ्यांच्या दिंडीला परतत असताना अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने या दोन्ही अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची आतापर्यंत जीवितहानी झालेली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत