मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न: मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्तकांनी बदनामी केली, रमेश करेंचा आरोप
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकाचा आत्महत्येचा प्रयत्न: मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्तकांनी बदनामी केली, रमेश करेंचा आरोप
वृत्तसंस्था औरंगाबाद - मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबूल लाईव्ह करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून नेमके त्यांनी हे फेसबूक लाईव्ह कुठून केले, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
आपण समाजाला कधीही विकले नाही. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्तकांनी आपली बदनामी केली. ही बदनामी असह्य झाल्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे रमेश केरे यांनी म्हटले आहे.
रमेश केरे यांनी फेसबूक लाईव्हमध्ये म्हटले आहे की, मला माफ करा. सर्व बांधवांना हा माझा शेवटचा जय शिवराय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र, सोशल मीडियात माझी ऑडिओ क्लिप फिरवून माझी बदनामी केली जात आहे.
रमेश केरे म्हणाले, हे माझे शेवटचे फेसबूक लाईव्ह आहे. मी मराठा आरक्षणासाठी प्रमाणिक प्रयत्न केले. याची सरकारनेही दखल घेतली. सरकारने मराठा आरक्षणासाठी उपसमिती गठीत केली. त्याचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटलांना करण्यास मी विरोध केला. चंद्रकांत पाटलांचे हस्तक विनाकारण माझी बदनामी करत आहेत. ही बदनामी मी सहन करू शकत नाही.
रमेश केरे म्हणाले, समाजाचे नुकसान होईल, असे मी कधीही काहीही केलेले नाही. मी कधीही समाजाला विकले नाही. त्यामुळे ज्यांनी माझी बदनामी केली, माज्यावर आरोप केले, त्या सर्वांची चौकशी करावी, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे माझी मागणी आहे. त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे आरोपी सुटता कामा नये.
मी गेल्यानंतर माझ्या बायकोला, मुलाला सांभाळा, असे आवाहनही रमेश केरे यांनी केले आहे. रमेश केरे म्हणाले, माझी क्लिप कोणी व्हायरल केली हे मुख्यमंत्र्यांनी शोधून काढावे. त्याची सविस्तर चौकशी करावी. समाजाला मी आई मानतो, तिलाच विकण्याचे काम मी कसे करू शकतो.
लाईव्ह व्हिडिओमध्ये रमेश केरे ज्या ऑडिओ क्लिपचा उल्लेख करत आहेत ती क्लिप सोशल मीडियावर यापूर्वी व्हायरल झाली आहे. यामध्ये युती सरकारच्या काळात मराठा क्रांती मोर्चात फूट पाडण्यासाठी काही समन्वयकांनी पैसे स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातूनच रमेश केरे यांचे नाव समोर आले होते. मात्र, रमेश केरे यांनी आपल्या बदनामीसाठी ही क्लिप व्हायरल करण्यात आल्याचे म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत