मुरजी पटेल यांच्या उमेदवारीला आक्षेप नगरसेवक पद रद्द झाल्याने सहा वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी
मुरजी पटेल यांच्या उमेदवारीला आक्षेप
नगरसेवक पद रद्द झाल्याने सहा वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी
वृत्तसंस्था मुंबई : भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी आक्षेप घेतला आहे. खोटे जात प्रमाणपत्र दिल्याने पटेल यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले होते आणि २०१७ पासून त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली होती. तरीही पटेल अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवीत असल्याने ठाकरे गटाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदविला आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार पटेल यांच्यावर महापालिकेने कारवाई केली आहे. तरीही पटेल ही निवडणूक लढवीत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केली जातील, असे संदीप नाईक यांनी पत्रकारांना सांगितले. निवडणूक लढण्याच्या परवानगीबाबत उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली असताना त्यांनी उमेदवारी अर्ज कसा दाखल केला व निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारला, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला. बनावट धनादेशाचे प्रकरण, गुन्हे आणि नगरसेवकपद रद्द झाल्या बाबतची माहिती प्रतिज्ञापत्रात देणे बंधनकारक असताना ही माहिती पटेल यांच्याकडून लपविण्यात आली आहे. निवडणूक लढण्यास बंदी असल्याने त्यांचा मतदान करण्याचा अधिकारही काढून घ्यावा, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीलाही अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी आक्षेप घेतला. लटके यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात भविष्य निर्वाह निधीचा तपशील दिला नसल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत