Header Ads

Header ADS

मलनिस्सारण टाकीत गुदमरुन तिघांचा मृत्यू; वाघोली येथील दुर्घटना


 मलनिस्सारण टाकीत गुदमरुन तिघांचा मृत्यू; वाघोली येथील दुर्घटना

 

लेवाजगत न्युज पुणे:-सोसायटीतील मलनिस्सारण टाकीची स्वच्छता करताना तीन कामगारांचा टाकीत गुदमरून मृत्यू झाल्याची घटना वाघोलीतील सोलासिया सोसायटीत शुक्रवारी सकाळी घडली. दिवाळीच्या निमित्ताने सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामावेळी ही घटना घडल्याने मृतांच्या घरी आणि सोसायटीत शोककळा पसरली.


    नितीन प्रभाकर गोंड (वय ४५, रा. बुलढाणा), सतीशकुमार चौधरी (वय ३५, रा. उत्तर प्रदेश), गणेश पालेकराव (वय २८, रा. नांदेड) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. वाघोलीतील सोलासिया सोसायटीच्या आवरातील मलनिस्सारण टाकीची (सेप्टिक टँक) स्वच्छता करण्याचे काम ठेकेदार गजानन कुरमभट्टी यांना देण्यात आले होते. त्यांनी कामगार नेमून काम सुरू केले होते. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता स्वच्छतेचे काम सुरू होते. त्यासाठी दोन कामगार टाकीत उतरले होते.

  कामगार बराचवेळ बाहेर न आल्याने तिसऱ्या कामगाराने ही माहिती सुरक्षारक्षकाला दिली. त्यानंतर दोघांना वाचवण्यासाठी तिसरा कामगार टाकीत उतरला. तिन्ही कामगार बराचवेळ बाहेर न आल्याने ते बेशुद्ध पडल्याच्या शक्यतेने रहिवाशांनी वाघोलीतील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन केंद्रास सकाळी सात वाजता ही माहिती कळवली. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन केंद्राचे पथक सोसायटीत तत्काळ दाखल झाले.


उचारांपूर्वीच कामगारांचा मृत्यू...

कामगार बाहेर येत नसल्याचा अंदाज आल्यानंतर जवानांनी मदतकार्य सुरू केले. गळ टाकून काही वेळात दोघांना बाहेर काढण्यात आले. बऱ्याच वेळ तिसऱ्या कामगाराचा शोध सुरू होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या कामगाराला बाहेर काढण्यात आले. तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच तिघांचा मृत्यू झाला होता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.