भिवंडीत तीन वर्षांच्या मुलीची हत्या, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
भिवंडीत तीन वर्षांच्या मुलीची हत्या, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू
वृत्तसंस्था भिवंडी- येथील शांतीनगर भागात एका तीन वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. गळा दाबून तिची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती भिवंडीचे उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली.
शांतीनगर येथील नागाव भागात मुलगी तिचे आई-वडील आणि दोन भावंडासोबत राहते. तिचे आई-वडील परिसरात भंगार विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे आई-वडील त्या मुलांना घरीच ठेवून कामासाठी जात असतात. मंगळवारी मुलीचे आई-वडील सकाळी कामाला गेले होते. दुपारी ते परतल्यानंतर त्यांची तीन वर्षीय मुलगी त्यांना दिसली नाही. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांचे पथक मुलीचा शोध घेत असताना बुधवारी सकाळी एका पडिक घरामध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. तिचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हत्ये प्रकरणात आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वीच भिवंडीत एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत