बकऱ्या चारण्यास मनाई केल्याने केळीची झाडे कापून फेकली दोघांना घेतले पोलिसांनी ताब्यात
बकऱ्या चारण्यास मनाई केल्याने केळीची झाडे कापून फेकली दोघांना घेतले पोलिसांनी ताब्यात
लेवाजगत न्यूज यावल -केवळ बकऱ्या चालण्यास मनाई केल्याच्या कारणावरून येथील केळी उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातील केळी झाडे कापून दोन संशयितांनी सुमारे सव्वा लाखांचे नुकसान केले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून या प्रकरणी येथील यावल पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी रावेर तालुक्यात केळीची झाडे कापून नुकसान केले हाेते. आता यावल येथेही त्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान दाेघा संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतली. शहरातील शेतकरी निर्मल नथ्थू चोपडे यांचे यावल शिवारात शेत (गट क्र. ८०८) आहे. त्यात त्यांनी केळीची लागवड केली आहे. केळीची बऱ्यापैकी वाढ झाली असून सध्या आठ महिन्याचे पीक झाले आहे.
त्यांच्या या शेतालगतच अट्रावल गावातील बकऱ्या चारणारे गुराखी येतात. दोन दिवसांपूर्वी सायंकाळी अट्रावल येथील सागर मानेकर व नामदेव कोळी हे दोघे शेतातून बकऱ्या नेत असताना त्यांना शेतकरी निर्मल चोपडे यांनी शेतात बकऱ्या चारण्यास मनाई केली होती. तेव्हा या दोघांनी चोपडे यांना धमकी दिली होती की,आता तू केळीचा हंगाम कसा घेताे हेच पाहू.
दरम्यान शुक्रवारी चोपडे यांचा सालदार मिलिंद नेमाडे शेतात गेले असता त्यांना केळी पिकाची झाडे कापून फेकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शेतकरी निर्मल चोपडे यांना माहिती दिली. शेतात जावून पाहिले असता सुमारे १५० केळीची झाडे कापून टाकल्याचे दिसून आले. ही झाडे धमकी दिल्यानुसार सागर मानेकर व नामदेव कोळी, रा. अट्रावल यांनीच कापून फेकल्याचा संशय व्यक्त करत यावल पोलिसांत दोघांविरुद्ध फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी तातडीने दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून हवालदार राजेंद्र पवार तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत