Header Ads

Header ADS

कामसिध्दीस नेणारा कामदेव- माघ शुध्द पौर्णिमेस ( दि.४ व ५ फेब्रुवारी २०२३ ) दांडी पौर्णिमा म्हणजेच कामदेवाची यात्रा

 

Kamasiddhis-carrying-Kamadeva-Magha-Suddha-Poornimas-Date-4-and-5-February-2023-Dandi-Poornima- means-Kamadeva's-journey.

कामसिध्दीस नेणारा कामदेव-

माघ शुध्द पौर्णिमेस ( दि.४ व ५ फेब्रुवारी २०२३ ) दांडी पौर्णिमा म्हणजेच कामदेवाची यात्रा

         भारतात कामदेवाची मंदिरे फारच क्वचित ठिकाणी आढळतात.एक मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन येथे तर दुसरे जागृत देवस्थान रोझोदा.ता.रावेर जि.जळगाव येथे आहे.

     मंदिराची पूर्वपिठीका :- श्री कामसिध्द मंदिराविषयी काही कथा ऐकिवात आहेत.त्यापैकी एक म्हणजे गुन्हेगार म्हणून त्याकाळी प्रसिध्द असलेले पेंढारी जमातीचे लोक एकदा रोझोदा गाव लुटण्यासाठी आले.त्यांना आपल्या शौर्याविषयी गर्व होता.तेव्हा गावातील एक सत्पुरुष श्री.रामजीबाबा यांनी गावाबाहेर येऊन त्यांना एक काठी दाखवून सांगितले की,ही श्रीकामदेवाची मानाची काठी आहे.तिच्यावरील सव्वा हाताचा भाग तुम्ही गोफणीने मोडून दाखवा व बिनधास्त गावात जा व हवे ते न्या.पेंढा-यांनी देखील खूप प्रयत्न केला.पण त्यांना त्यात यश मिळू शकले नाही.शेवटी त्यांनी हार मानली.रामजीबाबांनी ती काठी सहरित्या मोडून दाखविली.तेव्हापासून पेंढारी समाज कामदेवाची मनोभावे पूजा भक्ति करु लागला.तो दिवस माघ शुध्द पौर्णिमेचा होय.

कामसिध्दीस नेणारा कामदेव-  माघ शुध्द पौर्णिमेस ( दि.४ व ५ फेब्रुवारी २०२३ ) दांडी पौर्णिमा म्हणजेच कामदेवाची यात्रा


     रोझोदा गावातील श्री.फेगडे यांच्याविषयी अशीच अख्यायिका आहे.श्री.फेगडे हे आपल्या शेतात नांगणी करत असताना एके ठिकाणी त्यांचा नांगर रुतला व त्या ठिकाणाहून रक्ताचे तुषार उडाले.श्री.फेगडे यांनी आपल्या अंगातील सद-याची चिंधई फाडून त्या ठिकाणी टाकली व तिथे मनोभावे पूजा करुन ती जमीन या देवस्थानासाठी दान म्हणून दिल्याची अख्यायिका सांगितली जाते.

     बैलाच्या पाठिवरुन लाकडे वाहून नेणा-या समाजाविषयी अख्यायिका अशी आहे की बंजाराटोळीचा नायक एके दिवशी लाकूड वाहून नेत असताना एका लाकडाचा स्पर्श जमिनीला झाला.त्या ठिकाणी जमिनीतून रक्ताचे तुषार उडाले.त्या नायकाने त्या ठिकाणी पूजा केली व त्याला मुलबाळ नसल्याने त्याने पुत्रप्राप्तीसाठी नवस केला व त्या नवसाचेच फळ म्हणून की काय त्याला पुत्र प्राप्ती झाली.म्हणजेच आपल्या मनाची इच्छा पूर्ण करणारा,नवसाला पावणारा,आपले काम सिध्दीस नेणारा देव म्हणून या देवस्थानाचे नाव पडले श्रीकामसिध्द.

      जागृत देवस्थान :- सर्वत्र कामदेवाची मंदिरे गावाबाहेर गावाच्या सीमेवर असून येथील श्रीकामसिध्द मंदिर देखील गावाच्या परिघाबाहेर आहे.जीर्णोध्दाराच्या वेळी त्या काळच्या प्रमुख मंडळींच्या स्वप्नात श्रीकामसिध्द महाराज येऊन त्यांनी आदेश दिला की ' माझे देऊळ आणि माझ्या पायऱ्या जशा आहेत तशाच राहू द्या.देवळात कोणतेही परिवर्तन करायचे नाही.' त्याप्रमाणे मंदिराची उंची बेताचीच आहे.१९२३मध्ये मंदिरासमोर एक सुंदर कमान दीपमालांसह बांधली आहे.या देवतेचे असे वैशिष्ट्ये आहे की,ती सदावर्धिष्णू आहे.बाणाच्या रुपाने ती मोठी होत राहते आणि एका विशिष्ट उंची नंतर आपोआप भंग पावतो.यापूर्वी सन १९६६ मध्ये जवळ जवळ गाभा-याच्या छताला टेकू पाहणारी देवता पूर्णपणे आपोआप भंग पावली.याला सारा परिसर आजही साक्षीदार आहे.भग्न अवशेष ग्रामस्थांनी विधीपूर्वक गोळा करुन बैलगाड्यांमध्ये भरुन गावातून वाजत गाजत तापी नदी येथे नेऊन समारंभ पूर्वक विसर्जित केले.निराकार देवतेच्या जागृततेचे हे उत्तम दर्शनच आहे.

     कामदेव म्हणजे सर्व देवात सुंदर देव.मदनाचा पुतळा म्हणजे कामदेव.मग अशीच एखादी सुंदरशी मूर्ती येथील मंदिरात असेल असे कोणालाही वाटणे स्वाभाविकच ! पण येथील देवस्थानाचे वैशिष्ट्ये असे की येथे अन्य मंदिरांप्रमाणे व्यासपीठ नाही.कोणत्याही धातू - दगडाची वा अन्य कोणत्याही वस्तूंची मूर्ती नाही.येथे आहे फक्त बाण.हे स्वयंभू देवस्थान दरवर्षी इंचा इंचाने वृध्दिंगत होत आहे.१९६६ साली संपूर्णपणे कोसळून पडलेल्या जागी एकाच रात्रीतून तीन इंच उंचीचे दोन बाण वरती आले.ते आज सुमारे साडेतीन फुट उंचीचे झाले आहेत.कलियुगातील हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.श्रीकामसिध्द मंदिराच्या मागे एक पिर असून येथेही नित्यनियमाने भाविक येऊन दर्शन घेतात.अशा या कामसिध्दाच्या पटांगणात सर्वधर्म समभावाचे दर्शनही घडते.त्यातून एकात्मतेचा संदेश देखील प्राप्त होतो.    


                      मनोकामना

रोझोदा टुमदार गाव असे आमुचे

जागृत श्रीक्षेत्र येथे श्रीकामसिध्द महाराजांचे.

या पावन भूमित सारेच सुखाने नांदती

श्रीकामदेवाचेच नाव असते सदा ओठावरती.

नांदती माता लक्ष्मी सरस्वती घरी आमुच्या

असतो घराघरात देव्हा-यात श्रीकामदेव आमुच्या.

दुःखितांचे दुःख हरण्यासाठी

आहे श्रीक्षेत्र हे धाडीच्या तिराकाठी.

नाही येथे जाती धर्माचा भेद कुठला

माघ शुध्द पौर्णिमेस सारेच होती गोळा.

भक्तगणांच्या पूर्ण होती सा-या मनोकामना

असो दीन दुबळा तरी श्रध्देची असते मनी भावना.

सोहळा लोकनाट्य तमाशाचा जत्रेत रंगतो

मेळा महाराष्ट्र संस्कृतीचा येथे घडतो.

नसेल होत कुणा मुल बाळ

पदरात लिंबू झेलून घडतो येथे साक्षात्कार.

श्रीकामसिध्दाच्या पटांगणी नसतो आनंदाचा तोटा

जत्रेचे दोन दिवस येथे नतमस्तक होऊन तर बघा.

   जत्रेचे दोन दिवस येथे नतमस्तक होऊन तर बघा.

     

     मूळपिठाचे स्वरुप :- रामदेव बाबांच्या स्मरणार्थ त्यांच्या समाधीवरच जी मुळ वास्तू उभी करण्यात आली तीत छोटेस मंदिर व त्या समोरील पाच पाय-यांचा समावेश होतो.मूळ मंदिरासमोर अन्यत्र कोठेही न दिसणारी अशी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे मंदिरासमोर नंदी आणि महादेवाची पिंडी आहे.म्हणजेच मदन आणि शंकराचा संबंध येथे ही स्पष्ट होतो.एका अर्थाने हा कामशंकर योगच आहे.याविषयी आख्यायिका अशी की कोणे एके काळी गाभा-यातील निराकार बाणांना अर्पण केलेल्या सोन्याच्या डोळ्यांच्या मोहात पडून चोर येथे आले.बाबांनी त्यांना आंधळे करुन त्यांचा निष्पात करुन समोरील पायरीखाली घातले.म्हणूनच पायऱ्या खोदायच्या नाहीत हा समज आहे.अशी अख्यायिका पारंपारिक कथेमध्ये शुर्पक याला शंकराने पायदळी तुडविले या कथेशी समांतर आहे.म्हणूनच ग्रामस्थांनी देवळाची मूळ रचना तशी ठेवून यापूर्वीही चार वेळा परिसराचा विकास केला आहे.आता होत असलेला जीर्णोद्धार याला अपवाद नाही.

    कामसिध्द हे रुढार्थाने ग्रामदैवतच नव्हे तर ती ग्रामरक्षक देवताच आहे.मंदिराच्या परिसरात शितला देवीचेही स्थान आहे.या देवतेच्या प्रभावाने कोणे एकेकाळी रोझोदा गावात सदैव प्लेग काँलरा देवी यासारख्या साथीच्या रोगांपासून सदैव मुक्त राहिले आहे.अशीच लोकांची व भक्तगणांची धारणा आहे.विघ्नहर्ता गणेश,माता दुर्गादेवी तसेच मारुतीचे मंदिरही येथे आहे.

   यात्रा :-  प्राचीन काळी वसंतोत्सवात नागराजन कामदेवाची पूजा करीत व तो दिवस आमोद - प्रमोदाने घालवीत.दरवर्षी माघ शुध्द चतुर्दशी व पौर्णिमा या दोन दिवशी नवस करणा-यांची येथे गर्दी जमते.यात्रेच्या दिवशी एक महत्त्वाचा धार्मिक विधी म्हणजे देवकाठीच्या ध्वजाचे नुतनीकरण या दिवशी गावातील व पंचक्रोशीतील भगत घुमत,वाजत गाजत ग्राम प्रदक्षिणेला नेतात.जुना ध्वज बदलवून नवीन ध्वजाची उंच काठीवर स्थापना करतात.अशा प्रकारे ही मदन ध्वजा दरवर्षी नव्याने फडकते.या विधीला नवरथ विधी म्हणतात.कामदेवाला अप्सरांचा व ऋतूंचा अधिपती मानला आहे.( ब्रम्हांड ३.८.१८ )तो वेश्या व गणिकांचाही उपास्य देव असून त्यांना त्यांच्या प्रित्यर्थ व अंगदान करावे असे हेमाद्री सांगतो.म्हणून आजही यात्रेमध्ये दोन दिवस गणिकांचे नृत्य होतात.तसेच लोकनाट्य तमाशा नृत्याचे कार्यक्रम या उत्सवाचा भाग म्हणून ग्रामस्थ उत्साहाने दोन्ही दिवस रात्री पार पाडतात.यात्रेच्या दिवशी देवस्थानासमोर लहान मुलांच्या खेळण्या पाळण्यांपासून ते घरगुती वस्तु तसेच विविध खाद्य पदार्थांची दुकाने मोठ्या संख्येने मांडलेली असतात.

     कामसिध्द हे ग्रामदैवत :-  रोझोदा वासियांना व पंचक्रोशितील अबालवृध्दांना या दैवताच्या इच्छापूर्तीचा सातत्याने अनुभव आला आहे.म्हणूनच या परिसरातील लोकांची अशी श्रध्दा आहे की, कोणतेही काम करण्यापूर्वी श्रीकादेवाकडे विनवणी करा मग कामास लागा.लग्न असल्यास पहिली लग्न पत्रिका श्रीकामदेवाच्या चरणी दिली जाते.नवीन वाहन असो वा बांधकाम प्रारंभ करण्यापूर्वी तसेच कोणतेही कार्य सुरु करण्यापूर्वी कामसिध्द होण्यासाठी कामदेवाकडे विनवणी केली जाते.सात आठ वर्षापूर्वी रोझोदा येथे चिनावल रस्त्याने मोबाईचे टाँवर उभे केले जात असताना तेथील कामगारांना खूप प्रयत्न करुनही टाँवरची लोखंडी पट्टी बसवणे जमतच नव्हते.एका कामगाराने ग्रामस्थाला विचारले की या गावात कुठे जागृत देवस्थान आहे ? ग्रामस्थाने सांगितले आणि सदर कामगाराने कामसिध्द मंदिरात येऊन विधीवत पूजा केली नारळ फोडले नंतर ते काम सुरळीतपणे पूर्ण झाले.पूर्वी गावात नाट्य मंडळाच्या वतीने नाटक सादर करण्यासाठी शेडचे काम सुरु असताना नवीन दोर वापरुन सुध्दा दोर तुटत जायचा.नाट्य मंडळातील एका कलावंताने विचारले की येथे जागृत देवस्थान आहे का ? जेव्हा त्यांना कामदेवाविषयी माहिती तेव्हा नेपथ्यासह सर्व कलावंत कामदेवाकडे येऊन विनवणी केली असता बाधा दूर होऊन  नाट्य कलावंताना देखील साक्षात्कार झाला.कामसिध्द मंदिराच्या पटांगणात सभामंडप तयार करण्याच्या कामासाठी भरत महाजन यांनी बराच वेळ प्रयत्न करुन देखील सभामंडपाच्या आखणीच्या कामात यश मिळत नव्हते.भरत महाजन हताश झाल्याचे पाहून  टेनूदास फेगडे यांनी कामदेवाकडे विनवणी घालण्याचे सूचविले असता त्यानंतर विधीवत पूजा करुन नारळ फोडले असता आखणी यशस्वी होण्याचा साक्षात्कार झाला.त्याच प्रमाणे सभामंडपाच्या उभारणीच्या प्रसंगी लोखंडी एँगल्सचे काम करीत असताना नरेंद्र पाटील यांना अनेक वेळा प्रयत्न करुनही यश मिळत नव्हते.तेव्हा पाटील यांना कामदेवाकडे विनवणी करताच साक्षात्काराचा अनुभव आला.

    आजही यात्रेचे हे दोन दिवस रोझोदा वासियांच्या जीवनातील मंतरलेले दिवस म्हणून महत्त्वाचे मानले जातात.उद्योग धंदा व्यवसाय नोकरी निमित्ताने भारतभर विखुरलेले रोझोदावासीय तसेच पंचक्रोशितील भक्तगण न चुकता मोठ्या श्रध्देने यात्रेचे दोन दिवस गावाला येऊन हजेरी लावतात.आपल्या अडचणी दूर करण्यासाठी भाविक कामदेवाजवळ साकडे घालतात.मुलबाळ होत नसल्यास मुलांचे जावळ वाहण्याचा नवस केला जातो.नोकरी लागावी,आजारपण दूर करण्यास अथवा भाविकांची इच्छा पूर्ण झाल्यास भाविक पाच,अकरा,एकवीस नारळ फोडतात तर ज्यांच्या नावे नवस केला जातो त्यांना पारड्यात ठेवून त्याच्या वजना एवढा गुळ,जिलेबी किंवा पेढे दुसऱ्या पारड्यात समांतर करुन ते वाटण्याची प्रथा आहे.काही घंटा चढवितात.तर काही गावात वळू सोडतात.पण येथे नवसाला बळी दिला जात नाही.

    उपासनेची परंपरा :- देवस्थानाच्या स्थापनेपासून अनेक भाविकांनी आणि उपासकांनी या देवस्थानाची सेवा केली.अलिकडच्या काळात महंत सोनाबुवा यांनी ब्रम्हचारी राहून आयुष्यभर श्रींची सेवा तर केलीच.निर्गुण भजनाचाही उपक्रम निरंतर सुरु आहे.आजही देवराम चौधरी भगतबुवा यांच्या पुढाकाराने सोमवार गुरुवारला मंदिरात निरंतर भजनाचा कार्यक्रम सुरु आहे.आज ग्रामस्थांच्या भाविकांच्या कार्यकर्त्यांच्या व विश्वस्त मंडळाच्या परिश्रमाने या देवस्थानाचे परिसर अतिशय रमणीय झाला असून या पटांगणात लग्न समारंभांचे आयोजन केले जाते.थकल्या भागल्या जीवाने केव्हाही येथे येऊन दोन घटका बसावे.प्रसन्नचित्त व्हावे असे मंगलमय वातावरण आहे.अल्पावधीत गगन भरारी श्रीराम मंदिर व श्रीकामसिध्द मंदिर विश्वस्त मंडळ ही परिसरातील एकमेव संस्था आहे.या मंडळास क  वर्ग प्राप्त झाला असून सदर तिर्थक्षेत्रास पुढे ब वर्ग मिळाला आहे.श्रीकामसिध्द मंदिराच्या आवारात सुसज्ज असे ४५ x १५० फुटाच्या सभामंडपाचे काम लोकवर्गणीच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे.

                                श्री.राजेंद्र तुळशीराम चौधरी.

                                     रोझोदा.ता.रावेर.

                                  मो. ९४२३४७२७६५


                                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.