तीळ संक्रांत एक आपदा ???
तीळ संक्रांत एक आपदा ???
जानेवारी महिण्याच्या १४तारखेला तीळसंक्रांत येते /मकर संक्रांत सुद्धा म्हणतात. मी एक अशी म्हण वाचली होती. (संक्रांत येणे म्हणजे आपदा येणे )खरं तर तीळसंक्रांत किंवा मकर संक्रांतहा प्रामुख्याने सण / उत्सवाचा प्रकार नाहीच मुळी. हा हंगामाचा आनंद व्यक्त करण्याचा प्रघात आहे. म्हणजेच खरीपाची पिके निघण्याचा हंगाम , खरे तर सुगीला सुरुवात होते. म्हणून १४ जानेवारीला नवीन निघालेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे , घामाने फुललेल्या पिकांचा आजच्या दिवशी उत्सव केला जातो.तुरीच्या शेंगा , पोपटीच्या , वाटाण्याच्या शेंगा उकळून , तीळ गूळ यांचे मिश्रण करून , लाडू बांधून ऊसा ची पेर , बोर , आवळे , संत्रा, गाजर , पेरू , इ. फळे एकमेकांना वाटल्या जातात. नवीन धान्याची खिचडी , पेंढया उकळून साखरे सोबत खाल्ले जाते. व हे नवीन ' वाण 'इतरांनाही दिलं जाते.
इथे 'वाण ' म्हणजे सौभाग्याचं वाण असा अर्थ मुळीच धरू नये . ' वाण ' म्हणजेच नवीन मालाचा उत्पादित 'बीज 'नस्ल, किंवा मसाला किंवा नमुना असं पण म्हणता येईल. तीळ हा थंड प्रवृत्तीचा, गुणांचा आणि गूळ हा उष्ण गुणांचा असल्यामुळे शीत आणि गरम याच मिश्रण म्हणजेच तीळ आणि गूळ शरीराला आरोग्य वर्धक असल्यामुळे याचा उपयोग केल्या जातो. तसेच जानेवारी महिण्यात १४ तारखेला सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो व उत्तरे कडे वळतो म्हणून या क्रियेला खगोलीय / भौगोलीक भाषेत मकरसंक्रांत असेही म्हटलं जाते.
तीळ गूळ घ्या आणि गोडगोड बोला असे नारे लावून आपण बोलत असतो. त्यामुळे आपण ह्या आनंद उत्सवाला सण म्हणतो
आमच्या काही रूढीवादी, सनातनी लोकांनी 'हळदी- कुंकू 'किंवा सुहागिनीचा सण किंवा सौभाग्यवटी स्त्रियांचा सण असं ही म्हणून पंधरवाडा भर हा सण साजरा करतांना बायका दिसतातपण त्याच रूढी, परंपरा पाळीत असतो. मी बुद्ध ,कबीर , फुले शाहू , पेरियार रामास्वामी , नंगेली ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई भिमाई , जिजाऊ , सावित्री माई यांची लेक आहे. स्त्रियांना जागृत करणे हे माझे कर्तव्य आहे. मी त्यांचा वसा घेतला आहे. हे व्रत मला पाळायचे आहे . त्याकरिता
मी माझे कर्तव्य समजून . आपण चिंतन, मनन करून आपल्यामध्ये रुजवात करण्याची सुरुवात करावी.
.
कपाळावर कुंकू लावल्यानेच आपला नवरा, पती, घरधनी , दादला , मालक जे काही समजता ते दीर्घायूषीं होतं नाही तर दोघेही प्रेमाने राहिल्याने व सकस आहार सेवन केल्याने सुदृढ व दीर्घायुषीं होईल खरं ना?
कुंकू म्हणजेच सौभाग्याचं लेणे बिल्कुल नाही ते एक सौंदर्य प्रसाधन आहे. हे समजून घ्या ?
तुम्ही मराठी सिनेमा ' हळदी -कुंकू ' , हळद रुसली कुंकू हसलं पहिला असेल इथे सुद्धा हळदी कुंकू एका डबितराहत नाही. हळद आहे तर कुंकू नाही असं दाखविले आहे. तेव्हा आपण समजदार आहात.
( ४ ) तीळ संक्रांत आणि हळदी
कुंकू याच समीकरण जमवून बहुजन स्त्रियांच्या समोर अंधभक्त होण्यासाठी व अंधश्रद्धा पसरविण्यासाठी वाढ़ण्यात आलं आहे हे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही मंगळसूत्र नाही घातले तर तुमचा नवरा अल्पायुषीं होईल. लवकर मरेल. बाईंनी भोंड कपाळ ठेऊ नये. हातात बांगडया , पायात जोडवे, पाजेब, आणखी कितीतरी दागिने ! कानात, नाकात इ. इ. हो हे सगळं मान्य. भांगात कुंकू / सिंदूर , पण हे सौभाग्याचं लेणे नसून सौंदर्यांचे प्रतीके आहेत. स्त्रीने कसं सुंदर दिसावं, नटाव , थटाव मुरडाव यासाठी सारा प्रपंच. हे सर्व पुरुष प्रधान संस्कृतीचं लक्षण आहे.
स्त्रीला गुलाम बनवून ठेवण्यासाठी.
(५ ) हळदी कुंकू हा समारंभ घेणं म्हणजेच आवण मानता त्या हिंदू धर्मात विधवांना यात हीनवण्याचं महान कार्य आवण करतो असं आपल्याला नाही वाटत कां ?
फक्त नवरा जीवंत असलेली बाई म्हणजेच सौभाग्यवती ना ? असंच आहे ना? मग विधवा का ती स्वतःहुन झाली कां ? माणूस विधूर होतं नाही कां ? मग त्याला कां नाही अपशकुनी मानत ?
कोणी कर्जापायी बेजार होऊन आत्महत्येत गेला , कुणी सैन्यात भरती होऊन गोळीबारात सरहदीवर , आतंकवादी हमल्यात ,चकमकीत शहीद झाला. कुणी अपघातात गेला. कुणी आजारपणात गेला. कोणी कोणी तर दारूत डुंबुन मेला. आणि आता आता कोणी कोरोना महामारीत गेला. मग आत्ताबोला विधवा होणं तिला ठावं होतं कां?
मग विचार करा , डोळे उघडा हे सर्व थोतांड आहे. मनुवादी मानसिकता सोडा. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारा , डोळस व्हा. !
पतीच्या मेल्यानंतरच्या यातना जवळ घेऊन तिला विचारा काय होतात त्या ? मग कळेल.
नवरा सोडून गेल्यावर लहान चिले पिले यांचा सांभाळ कोण करेल तिलाच करावा लागेल ना.. मग तिने कंबर कसून काम करणे वाईट आहे काय ? नाही बिल्कुल नाही.
पण इथे शिकल्या सवरल्या , नोकरींपेशा बाया सुद्धा त्यांचे लचके तोडायला मागे पुढे पाहत नाही. त्यासाठी तुम्हांला आपली बाजू तपासून घ्यावी लागेल. तुमच्या घरातील मनुवादी गुलाम गिरीची मानसिकता पसरवणारे मुख्य घटक म्हणजेच टी. व्ही. , पेपर बंद करा . विकृत सीरिअलर्स पाहणे बंद करा. आपण सर्व मानव समान आहोत हे समजून जमलंच तर ह्या दिवशी एखाद्या विधवेला तिच्या अडचणी जाणून सहकार्य केलं तर आपली तीळसंक्रांत आणखी चांगली करता येईल. 'वाण वाटा 'त्याची देवाण घेवाण करा. उखाणे घ्या अवश्य. पण ! त्यामध्ये जसे आपण पटकन कपड्यालत्यानी मॉंडर्न झालो तसेच विचाराने मॉडर्न ( पुरोगामी ) व्हा ! आणि स्त्रिया लवकर परिवर्तन घडवून आणू शकतात. तीळागुळा प्रमाणे
गोडी असू द्या.
" विधवा "
विधवा धगधगता वास्तव
जगायच आहे निडर जीवन
धन्याचे स्वप्न पूर्ण करण्या
अहो रात्र मेहनत मी करीन
नियतिने घात केल्यामुळे
धनी गेले माझे साथ सोडून
माझ्या लेकरांचा बाप हरवला
संसार गेला माझा मोडून...
विधवेकडे वाकड्या नजरेनी
बघत असतात काही हैवान
दहशतीत पिलांना जगवते
मिटवूया सारे मिळून ही घाण
मुलांना सोबत घेऊन आता
सामाजिक कार्याचा वसा घेतला
तो करते रुग्ण सेवा करते
माझ्या मुलांचे शिक्षण पूर्ण करते
दुःखाचे डोंगर कोसळले जरी
जीवनात मागे नाही हटणार
विधवा म्हणून हिनवल तरी
कुणाला कधी नाही घाबरनार
या काळातील मी रणरागिणी
पिलांच्या पंखांना बळ देणार
वाईट वळणावरती आहे जरी
आजची आदर्श माता होणार....
आयुष्यात येणाऱ्या असंख्य व्यथा ना
धाडसाने सामोरे जाऊन आपल्या आयुष्यातील आव्हानांना धैर्याने पेलून प्रत्येक नारीने जीवनाचा महोत्सव करायला तयार असावं.जग बदलण्याची, जग जिकण्याची ताकद आपल्या मध्ये आहे
डॉ. अनिता बेंडाळे,नाशिक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत