Contact Banner

गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट

 

Gangamai-Sugar-Factory-Horrible-Explosion

गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट 

लेवाजगत न्यूज नगर-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगामाई कारखान्याच्या डीसलेरी विभागाला भीषण आग लागून स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीमध्ये कारखान्याचा मोठ्या प्रमाणात भाग जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी आठ वाजेच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर येऊ शकलेली नाही.

     कारखान्यापासून पाच किलोमीटरचा परिसर निर्मनुष्य करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून त्यासाठी तहसीलदार आणि पोलिस प्रशासन यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. शेवगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आग लागली असून इथेनॉलच्या टाक्या फुटल्याचेही प्राथमिक माहिती आहे.आगीने रौद्ररुप धारण केले असून इथेनॉल असल्यामुळे आगीची तीव्रत वाढतच आहे. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारखाना प्रशासन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

       आगीची तीव्रता मोठी असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. या आगीत किती नुकसान झाले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. सध्या आग आटोक्यात आणण्यासाठी कारखाना प्रशासन मोठी कसरत करत असून सर्वांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. कारखान्याकडे कोणीही जावू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.