Contact Banner

क्षण एक पुरे प्रेमाचा-डॉ. अनिता बेंडाळे

 

Moment-one-enough-of-love-Dr-Anita-Bendale

क्षण एक पुरे प्रेमाचा-डॉ. अनिता बेंडाळे,

     माणूस म्हणून शाबूत रहायच असेल तर, आयुष्यात प्रेम हवं असत. आपल्यावर प्रेम करणार कुणीतरी हवं असत तसच कुणावर तरी दिलखुलास प्रेमही हवं असत. वय वाढल आणि संसाराला अमुक एक वर्ष झालं म्हणून ज्याचं एकमेकांवरच प्रेम कमी होतांना दिसत, त्यांच्यात मुळातच प्रेम कमी आणि इगो अधिक असतो बहुतेक! तर व्हॅलेंटाईन डे ही मस्त संधी आहे. आपल्या प्रेमाला साद देण्याची.

              जाहिरात^√

जाहिरात लेवाजगत न्यूज


     लग्न जुनं झालं म्हणून कधी प्रेम जुनं होत का? जबाबदाऱ्या अन कामाचं रहाटगाडग तुम्ही एकमेकांवर प्रेम कराव म्हणून थांबणार थोडीच आहे. पण या सर्व धावपळीत नवरा बायको थोडा वेळ थांबून आपल्या जुन्या झालेल्या, रापलेल्या नात्यावर प्रेमाची फुंकर घालावी. अती ओळखीने अनोळखी झालेल्या जोडीदाराला नव्याने ओळखाव. त्यासाठी आतुर व्हावं, झुराव, हसावं, फुगाव प्रेमाच्या त्या गोड जगात सर्व विसरून, हरवून जावं. त्यासाठी खरतर एक दिवस नव्हे तर एक क्षणही पुरतो.

     संसाराच चक्र चालूच राहणार आहे. मुलांचा अभ्यास, शाळा आहे. त्यापेक्षा अधिक कमावण्यासाठीची धडपड, आल - गेल, पै पाहूणे, करण धरण, आजारपण मागे चिकटलेल असत. संसार म्हटलं की हात हे पोळणारच पण मग पोळणाऱ्या हातावर एकमेकांनी फुंकर घातल्यास आपल्यावर प्रेम करणाऱ्या आयुष्याच्या जोडीदारासाठी एक दिवस निवांतपणे काढायला काय हरकत आहे? प्रेमाची भाषा वयानुसार बदलते हे खरंय पण बदललेली ही भाषाही आपण अनेकदा व्यक्त करायला विसरून जातो. आपल एकमेकांवर प्रेम आहे हे सांगायलाही विसरून जातो. साऱ्याच गोष्टी गृहीत धरायला लागतो. गृहीत धरण हा प्रेमाचाच भाग असला तरी त्याचा अतिरेक झाला की अशावेळी गरज असते प्रेमाने भरलेल्या स्पर्शाची, चार गॉड शब्दांची. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांची एक सुंदर कविता आज आठवते...

मी म्हणालो बायकोला

आजपासून प्रेयसी तू

ती म्हणाली आजपासून चोरून भेटू

मी किनाऱ्याचा तिला पत्ता दिला

ती बिचारी खरकटी उरकून आली

मी तिला फेसाळलेल्या लाटा दाखविल्या

ती म्हणाली दूध हे जाते उतू

ती म्हणाली आठव वर्षे जुनी

मी म्हणालो काळ सारा गोठला

रूम मित्राने दिली एकांत रात्री

ती म्हणाली राहिली पोरे उपाशी

परतलो मग शेवटी आपल्या घरात

ती म्हणाली कोणती भाजी हवी डब्यात

वय वर्ष सोळा कधीच मागे सरलय नाही...

     लग्नालाही आता चांगली वीस एक वर्ष उलटून गेली आहेत. सगळंच शीळ पाक झालय का? म्हणजे आजूबाजूचे तरी तसच काहीस बोलत असतात. घरकी मुर्गी दाल बराबर... वगैरे... वगैरे... असला सगळा मामला आहे. मुसमुसणार तारुण्य, ते धुंद दिवस... एकमेकांबद्दल वाटणारी ओढ, रुसवे - फुगवे, एकमेकांना मनवण... त्यासाठीच्या नवीन क्लुप्त्या शोधून काढणे, ते सगळं संपलंय? की त्या बेधुंद मनाच्या लहरी संपून जाऊ नये असे मनापासून वाटत असलं तरी संसाराच्या रहाट गाड्यात आणि रोजच्या धावपळीत कुठे मिळतोय निवांतपणा? एकमेकांना न्याहाळण्याची खरी उसंत कुठे आहे? जर तुमच्याही मनात हे सगळं असे चालू असेल तर तुमच्यातल्या प्रेमाला नव्याने हाक देण्याची नामी संधी तुमच्याजवळ आहे ती म्हणजे व्हॅलेटाइन डे.  जग म्हणत व्हॅलेटाइन डे हा फक्त तरुणांचा दिवस आहे. कुणावर तरी भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा तो दिवस आहे. सोळाव धोक्याचं वरीस उलटून गेलं असलं आणि एक दोन पोरांची जबाबदारी पदरात असली म्हणून काय झालं? नात्याला टवटवी देण्यासाठी वयाच बंधन असत नाही.

     नुसत्या विचारानेही झपाटल्यासारखं ओढलं जातो एका अनामिक विश्वात. मनाला टीचक्या मारणाऱ्या आणि पोटातल्या फुलपाखरांना मुक्त संचार करू देणाऱ्या एका सुंदर जगात. या जगात आपण किती काळ टिकतो हा मुद्दा दुय्यम पण लग्न झाल्यानंतर संसाराची धुरा वाहत असतांना एकमेकांवर भरभरून प्रेम करत असतांना गरज असते ती फक्त प्रेम व्यक्त करण्याची. आपल्या शब्दातून वर्तनातून आपल्या प्रेमाला अत्यंत मोकळेपणाने आपल्या जोडीदारापर्यत पोहोचविण्याची. 

     वय वाढले, अभिव्यक्तीचे शब्द बदलले तरी त्यातला थरार आणि समरस होणं मात तेच असते. प्रेम करायचं आणि मनाला हुरहूर लागणार नसेल, पोटात आपल्या आवडत्या माणसाच्या विचारानेही फुलपाखरं उडणार नसतील, काहीतरी मस्त वाटणार नसेल तर त्या नात्याला अर्थ काय? प्रेम ही काय 4 - 6 वर्ष करायची आणि मग मनाच्या मागच्या खणात पार खाली खोचुन ठेवून देण्याची गोष्ट आहे का? 

लोक जेव्हा म्हणतात ना झाली आता लग्नाला 20 वर्षे आता कसलं प्रेम, तेव्हा मला त्या माणसांचं फार आश्चर्य वाटते. जगण्यासाठी अन्न, पाणी लागत ना... एकदा जेवल की पुरत का आयुष्यभर? नाही ना? मग काही वर्षे प्रणयात, प्रेम करण्यात घालवल्यानंतर त्याची गरज माणसांच्या आयुष्यातुन संपून कशी जाते?

     व्हॅलेटाइन डे साजरा करण्याची जबाबदारी तरुणांवरच का सोपवावी? या एका दिवसातली प्रेमाची गंमत नवरा बायकोनेही अनुभवून पहावी. मानसोपचार तज्ञांच्या मतानुसार आई - वडिलांमध्ये असणारा संवाद आणि त्यांच्यातलं प्रेम बघूनच मूल स्वताच्या जीवनाच्या कल्पना तयार करत असतात. ही प्रक्रिया अनेकदा त्या मुलांच्या नकळत बनते. आई बाबा एकमेकांशी प्रेमाने बोलत असतील, प्रेम व्यक्त करत असतील तर भविष्यात मुलांचं सहजीवनही अतिशय सुदृढ असण्याच्या शक्यता बळावतात. त्या व्हॅलेटाइन डे कडे फक्त फॅड म्हणून बघण्यापेक्षा सुखी जीवनाचा मूलमंत्र मुलांपर्यंत पोहोचवण्याच एक माध्यम म्हणून बघायला हरकत नाही.

डॉ. अनिता बेंडाळे,नाशिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.