बाईक वरील तिघांनी जिनिंग मुनिमास लुटले
बाईक वरील तिघांनी जिनिंग मुनिमास लुटले
लेवाजगत न्यूज सिल्लोड -भरदिवसा चोरट्यांनी २५ लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावल्याने व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी सिल्लाेड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भरदिवसा तेही शहरात चाेरी केल्याने चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हानच दिले आहे.
या घटनेबाबत पाेलिसांनी सांगितले की, सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नवीन कोटेक्स जिनिंगचे मुनीम गोविंद तायल राेख आणण्यासाठी सोमवारी अकरा वाजेच्या सुमारास शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एसबीआय बँकेत आले. या बँकेतून राेख २५ लाख रुपये घेऊन ते त्यांच्यासोबतच्या व्यक्तीसह जिनिंगकडे निघाले. त्याच वेळी भराडी रस्त्यावरील संत एकनाथ शाळेच्या पाटीजवळ सिल्लोड शहराकडून डाव्या बाजूने एका मोटारसायकलवर तीन अज्ञात चाेरटे आले व त्यांनी मुनीम गोविंद रामजीलाल तायल (५४) यांच्या हातातील बॅग हिसकावली. यादरम्यान बॅग फाटल्याने त्यातील पाच लाख रुपये रस्त्यावर पडले व वीस लाख रुपये घेऊन तिन्ही चोरटे मोटारसायकलवर भराडीकडे वेगात पसार झाले. या चोरीची जिनिंग मालकास माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही कर्मचाऱ्यांना घेऊन तात्काळ पोलिस ठाणे गाठले. चोरांविरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरटे जेरबंद होतील : मराठे
चोरीची घटना घडताच अतिरिक्त ग्रामीण पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी तात्काळ सिल्लोडला धाव घेतली. गुन्हे शाखा विभागाचे रामेश्वर रेंगे यांचे पथकही चोरट्यांच्या मागावर असून लवकरच चोरटे जेरबंद होतील, असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
चाेरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दरम्यान अज्ञात संशयित चोरटे भराडी रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्या दिशेने पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या चोरीचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक लहू घोडे, पोलिस उपनिरीक्षक बापूसाहेब झिंजुर्डे व त्यांचे सहकारी करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत