मुख्यमंत्री कार्यलयातील अधिकारी म्हणतात आता आमची आवराआवर सुरु ...
मुख्यमंत्री कार्यलयातील अधिकारी म्हणतात आता आमची आवराआवर सुरु ....
वृत्तसंस्था मुंबई -सर्वोच्च न्यायालयाचा राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल केव्हाही येऊ शकतो. त्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात सध्या चलबिचल सुरू आहे. आम्ही आता आवराआवर सुरू केली आहे, अशी भावना सीएमओतील अनेकांची आहे.
शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या याचिकांवर गेल्या आठ महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायाधीशांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. त्यातील एक न्यायाधीश १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. तत्पूर्वी निकाल येईल, असे अपेक्षित आहे. त्यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता वाढली आहे. शिंदे गटाचे मंत्री बॅकफूटवर गेलेले दिसतात. इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात निकालाच्या चर्चा सुरू आहेत.
आम्ही आता आवराआवर सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयातील एक अधिकारी म्हणाला. उर्वरित निर्णय आम्ही गतीने मार्गी लावत आहोत, खास करून आर्थिक विषयाच्या निर्णयांना प्राधान्य आहे, असे सीएमओतील दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले. योगायोगाचा भाग म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारचे सर्व कार्यक्रम रद्द केले.
शिंदे यांना दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी एका माध्यम संस्थेचा कार्यक्रम अर्ध्यावर सोडला.भाजपमध्ये मात्र शांतता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असा दावा केला.
भाजपबरोबर सत्ता स्थापन केलेला शिवसेनेचा शिंदे गट सध्या बॅकफूटवर असून पूर्वी असलेला शिंदे गटाचा आत्मविश्वास संपलेला दिसतो आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार असेच सातत्याने सांगत आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागतो याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शिंदे आणि ठाकरे यांच्यातील वाद वाढीस लागला आहे. अलीकडेच एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून शिवसेनेच्या संपत्तीवर स्थगिती आणण्याची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे सरकारचे काय होईल, अशी चर्चा मंत्रालयातल्या सर्व मजल्यांवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे या संभ्रमात आणखी भर पडली आहे. याउलट ठाकरे गटातील नेत्यांचा आत्मविश्वास मात्र वाढला आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिंदे गटावर आज पुन्हा जोरदार हल्ला चढवला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत