Contact Banner

सावद्यात सोमवार पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा; मुख्याधिकाऱ्यांची माहिती

सावद्यात ८ पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा; मुख्याधिकाऱ्यांची माहिती


 सावद्यात सोमवार पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा; मुख्याधिकाऱ्यांची माहिती

लेवाजगत न्यूज सावदा-शहरात येत्या सोमवारपासून एक दिवसाआड ऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. पाण्याचा कमी आणि योग्य वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

     भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील "अल निनो' या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

     यामुळे जूननंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणाच्या उपाययोजना राबवणे आवश्यक आहे. मे महिन्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची संभावना दिसून येत असल्याने बाष्पीभवनामुळे होणाऱ्या पाण्याचा -हास विचारात घेता अचानक पाणीसाठा खालावू शकतो. अशा परिस्थितीत आगामी कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची परिस्थिती सर्वसाधारण स्थितीपेक्षा गंभीर होऊ शकते. त्या साठी २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय स्तरावर बैठक आयोजित केली होती. त्यात ऑगस्टपर्यंत शहरी भागात संभाव्य पाणीटंचाई निवारणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना व नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे..

शहरात तापी नदीवरील हतनूर धरण बॅक वॉटरमधून मांगलवाडी शिवारातील जॅक वेल येथून सावदा शहराला पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने जलाशयाची पालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी पाहणी केली. शहराच्या संभाव्य पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी ८ मे पासून नागरिकांना एक दिवसाआड होणारा पिण्याचा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी चव्हाण यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.