रेल्वे कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीच्या दिवशीच मृत्यू
रेल्वे कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीच्या दिवशीच मृत्यू
लेवाजगत न्यूज भुसावळ -३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर बुधवारी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी एका ठिकाणचा सत्कार स्वीकारुन भुसावळ येथे दुसऱ्या सत्कार सोहळ्यासाठी जाणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला.
मूळचे जामनेर येथील वाकी रोडवरील रहिवासी असलेले सुरेश मोहन सोनवणे (वय ६०) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हे पाचोरा रेल्वे स्थानकावर रुळ दुरुस्ती कर्मचारी म्हणून गेल्या तीन वर्षांपासून पाचोरा येथे सेवेत होते. ३२ वर्षांच्या सेवेनंतर ते बुधवारी सायंकाळी पाच वाजता सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे त्यांचा पाचोरा येथील कार्यालयात सकाळी १० वाजता सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते लोकमान्य टिळक गोरखपूर काशी एक्स्प्रेसने १२.३५ वाजता भुसावळ येथे मुख्य कार्यालयात सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जाणार होते. मात्र, ज्या गाडीने अर्थात काशी एक्स्प्रेसने ते भुसावळ जाणार होते. त्या गाडीत बोगीत चढत असताना पाय घसरून ते खाली पडले. नेमके त्यांच्या मानेवरून रेल्वे गेल्याने जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी भ्रमणध्वनीद्वारे जामनेर येथे कळवल्यानंतर पत्नी व मुलगा हे पाचोरा येथे आले. त्यानंतर त्यांनी मोठा आक्रोश केला. त्यांच्यावर रात्री उशिरा जामनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुरेश सोनवणे यांचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. टाक यांनी शवविच्छेदन केले. या घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे पाचोरा व जामनेर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत