त्वचा रोग लेखनमालेतील भाग तीन त्वचा रोगातील आयुर्वेद अनुसार अपथ्य
त्वचा रोग लेखनमालेतील भाग तीन
त्वचा रोगातील आयुर्वेद अनुसार अपथ्य
अपथ्य अर्थात जे पथ्य नाही असे ते, जे व्याधीला वाढवते .
त्वचारोगाने पीडित असलेल्या लोकांना मांसाहार, विशेष करून मत्स अथवा मासे, जलचर आहार करायला नको. आचार्यांनी संहितेमध्ये अनेक प्राण्यांचे मास अनेक गुणांनी युक्त असलेले सांगितलेले आहे. हे गुण विशिष्ट व्याधीत विशिष्ट वेळी औषध म्हणून काम करतात. याच करिता वैद्य अथवा आयुर्वेद तज्ञ यांचा सल्ला घेतल्याशिवाय आहारात मांसा आहाराचा समावेश करू नये.
आयुर्वेदात त्वचारोगातील अनेक व्याधीत दुधाचा सुद्धा निषेध सांगितलेला आहे. व्यावहारिक दृष्ट्या बघितला रुग्ण जर श्रीमंत असेल तर त्याचा दुग्ध आहार बंद केल्यानंतर पोषण स्तरांमध्ये विशेष फरक पडत नाही. परंतु रुग्ण गरीब असेल त्यातल्या त्यात अतिशय बारीक असेल तर त्याचा दुग्ध आहार बंद करणे उचित नसते. अशावेळी दुधामध्ये हळद मिसळून ते तापवावे. असे तापवून उकडलेले दूध रुग्णाला सेवन करण्यासाठी सांगावे. कोको पावडर मिश्रित तथाकथित एनर्जी पावडरला दुधात मिसळू नये. दही, ताक पनीर ,चीज ,श्रीखंड हे पदार्थ सुद्धा वर्ज करावे. जे सेवन केल्याने त्वचारोगात स्त्राव ,खाज तसेच सूज वाढण्याचा धोका असतो.
उस खाणे, उसाचा रस पिणे हे कफ वर्धक असल्याने आयुर्वेद अनुसार त्वचा रोगात ऊस सेवन देखील वर्ज्य आहे.
आता धान्याच्या दळून केलेल्या पिठापासून बनलेले पदार्थ देखील त्वचारोगात खाऊ नये. जसे गहू पिठापासून बनलेले लाडू , मैद्याचे पदार्थ, तांदुळाच्या पिठापासून बनलेले पदार्थ. थोडक्यात सांगायचे झाले म्हणजे वरील बऱ्याच पदार्थात पिठावर अग्नीचे संस्कार झालेले नसतात.पोळी, गव्हाचे पापड, तांदळाचे पापड या श्रेणीत येत नाही. या आहार वस्तूंना बनवताना आपण त्यांना अग्नीवर भाजून खातो.
ज्या ज्या गोष्टी आंबट आहेत त्या देखील खाऊ नये. आंबट चवीच्या गोष्टी शरीरात शेतीला निर्माण करतात. शरीराचे प्राकृतिक सौष्ठव (built) नष्ट करतात. याचा परिणाम म्हणून व्याधी वाढायला लागतो. त्वचा रोगी असलेल्या व्यक्तीने चिंच लिंबू, ताक, दही ,कोकम ,कढी, टोमॅटो, सॉस, कैरी,लोणचे, मुरंबा, भेळ ,पाणीपुरी, चाट मसाला, जलजिरा, चायनीज या गोष्टी खाउ नये.
गुणाने विरुद्ध असलेल्या अनेक अन्न पदार्थ सेवनाने सुद्धा त्वचा रोग बरे होत नाहीत. जसे मीठ अथवा मी टाकलेले पदार्थ दुधासोबत खाऊ नये .
आधी खाल्लेल्या आहाराचे पचन होण्याच्या आधी पुन्हा भोजन करणे देखील त्वचा रोगी व्यक्तीला निषिद्ध असते. आहार पचण्यासाठी किमान तीन तासाचा अवधी लागत असतो.
अजीर्ण झालेले असताना भोजन करणे हे सुद्धा त्वचारोगी असलेल्या व्यक्तीमध्ये निषिद्ध आहे. सकाळी जेवण केल्यानंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच वेळा भूक लागत नाही. भूक लागलेली नसताना देखील मुद्दाम अथवा जबरदस्ती जेवल्यास त्वचारोग वाढतात.
विदाह उत्पन्न करणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन त्वचारोगी असलेल्या व्यक्तीने करू नये. जसे लाल मिरची काळी मिरची अथवा मसालेदार भोजन करू नये.
अपथ्य विहार
विहार म्हणजे प्रवृत्ती (activity) . अपत्य विहाराचा अर्थ असा होतो की, असे कर्म जे केल्याने रोगांचे उत्पादन होते अथवा रोग वाढीस लागतात, रोगांची स्थिती कायम राहते.
अपथ्य विहारात खालील गोष्टी येऊ शकतात.
मळमळ होत असेल तर होणाऱ्या उलटीला थांबवणे. मुद्दाम घशात बोटे घालून उलटी करण्याची प्रवृत्ती करणे.
मलमूत्र, अपान वायू च्या वेगांना थांबवणे. क्वचित असावे थांबवावा लागला तर फार मोठी समस्या खरे तर उत्पन्न होत नाही, ही स्थिती पुन्हा पुन्हा केल्याने मात्र त्वचारोग उत्पन्न होतात अथवा वाढीस लागतात.
भरपूर भोजन केल्याच्या नंतर तत्काळ व्यायाम करणे अथवा मेहनतीचे काम करणे. त्यांना नंतर केवळ शंभर पावले चालण्याचा उपदेश आयुर्वेद देतो. अनेक डॉक्टर अथवा वैद्य दोन दोन किलोमीटर जाण्याचा सल्ला देतात. परंतु हे योग्य नाही.
अधिक उष्णतेच्या जवळ, प्रखर उन्हात सतत काम करणे.
सामान्य आहार वस्तूचे सेवन विशिष्ट क्रमाने होत असते. या क्रमाचे पालन न केल्यास देखील त्वचारोग उत्पन्न होतात. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तोंडातील तापमान थंड असते. तोंडातील तापमान सामान्य तापमान होण्याच्या आधी साधे पाणी अथवा गरम पाणी पिऊ नये . काही लोक गरमागरम चहा पिल्यानंतर लगेच थंड पाणी पितात. चहा पिल्यानंतर थंड अथवा साध्या पाण्याने चूळ भरतात. अत्यंत चुकीचे आहे. बराच वेळ एसीमध्ये बसल्यानंतर लगेच बाहेर साधारण तापमानाच्या खोलीत अथवा अंगणात जातात. दुसऱ्या क्षणी लगेच परत एसी च्या खोलीमध्ये येतात. अशी वागणूक देखील त्वचारोगांसाठी वाढीचे कारण असू शकते.
पूर्ण दिवस उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कालचा पुरवठा भरून काढण्यासाठी पूर्ण भरपूर जेवण करणे. अथवा एक दिवस उपवास दुसऱ्या दिवशी भरपोट जेवण असं व्यत्यासाने करत राहणे. ही वागणूक त्वचारोगीसाठी हानिकारक ठरू शकते.
अशा प्रकारे अपथ्य आहार आणि विहार यांचे विवेचन या लेखात केले. या लेखन मालेतील पुढील भाग काही दिवसानंतर प्रकाशित करण्यात येईल.
डॉ. सुशांत शशिकांत पाटील BAMS DYA आयुर्वेद तज्ञ सर्वद आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय विद्या नगर, भुसावळ रोड,फैजपूर ,वेळ सकाळी नऊ ते एक संध्याकाळी पाच ते आठ


कोणत्याही टिप्पण्या नाहीत