७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून -मृतदेह गुरांच्या चाऱ्यात लपवणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून -मृतदेह गुरांच्या चाऱ्यात लपवणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
लेवाजगत न्यूज भडगाव -जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावातच राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवून ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला असून या प्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात उमटले असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सदरील घटनेतील संशयिताला गुरुवारी पोलिसांनी अटक केली. स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील (वय-१९) असे या संशयिताचे नाव आहे. त्याने लैगिंक अत्याचार केल्यानंतर मुलीशी झालेल्या झटापटीत मुलीच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून दिल्याची कबूली दिली आहे. दरम्यान या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
या प्रकरणी राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत माहिती दिली. त्यांनी या प्रकरणी योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन सभागृहात दिले.
ज्या कडब्याच्या कुट्टीत या मुलीचा मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. त्याने अखेर या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावात सात वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. ३० जुलै रोजी पिडीत मुलगी दुपारी घरी एकटी असताना गावात राहणारा स्वप्नीलने पिडीत मुलीला गुरांच्या गोठ्यात बोलावून घेतले. त्यानंतर स्वप्निल पाटील याने मुलीसोबत जबरदस्ती केली. या दरम्यान स्वप्निलने दोनवेळा मुलीच्या डोक्यात गोठ्यात पडलेला दगड मारला. तसेच मुलीचा मृतदेह गोठ्यात असलेल्या गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवून दिला.
दोन दिवसांपासून मृतदेह कडब्यात असल्याने त्यातून दुर्गंधी येवू लागल्याने हा प्रकार १ ऑगस्ट रोजी उघडकीला आला होता. गावातील महिला आणि नातेवाईकांनी भडगाव पोलिस स्टेशन गाठून या ठिकाणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. तसेच पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन देखील केले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत