पंधरा लाखांची वीज चोरी, संशयिताला सक्तमजुरी विजेच्या मीटरशी केली होती छेडछाड
पंधरा लाखांची वीज चोरी, संशयिताला सक्तमजुरी
विजेच्या मीटरशी केली होती छेडछाड
वृत्तसंस्था जळगाव -औद्योगिक वापरासाठी घेतलेल्या वीज मीटरमध्ये छेडछाड करून २४ महिन्यांत महावितरण कंपनीची १५ लाखांची फसवणूक करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने दहा हजार रुपये दंड व एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. दोनगाव (ता. भडगाव) येथील औद्योगिक क्षेत्रात रऊफ अली अहमद अली यांची कंपनी आहे. त्यासाठी त्यांनी महावितरणचे वीज मीटर घेतले होते. त्यात छेडछाड करून रिमोट कंट्रोल व जामरच्या मदतीने मीटर बंद केले होते. सुमारे २४ महिन्यांच्या कालावधीत १ लाख ११ हजार ७८९ युनिटची चोरी करून महावितरणचे १५ लाख ३३ हजार ६९० रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. हा खटला जिल्हा न्यायाधीश ४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्या कोर्टात चालला. या खटल्यात सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता वैशाली महाजन यांनी काम पाहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत