माणसात आपला माणूस शोधणारा तेजोमय तारा निखळला
माणसात आपला माणूस शोधणारा तेजोमय तारा निखळला
भाषाप्रभु प्रा. डाँ. राम नेमाडे ( डोंबिवली ) हे नाव साहित्य क्षेत्रात असणाऱ्यांना नवीन नव्हते. लेवा गणबोली भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विडा घेतलेला, साहित्य क्षेत्रातील माणसात आपला माणूस शोधणारा तेजोमय तारा ९ जानेवारी २०२४ मंगळवार रोजी दुपारी निखळून पडला. माणूसकी असलेला प्रज्ञावंत प्रतिभावंत उदार आणि दिलदार लेखक, कवी माणूस हरपला. सत्यासाठी कोणाचीही कशाची भीती न बाळगता आपली भूमिका परखडपणे मांडणारा, सर्वांना आपलंस करणारा आपला माणूस अलविदा करुन अखेरचा निरोप घेऊन गेला.
२२ डिसेंबर २०१९ रोजी बोरीवली येथील माझ्या हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयात 'अमृतवेल' या माझ्या स्वलिखित पहिल्या कवितासंग्रह प्रकाशन सोहळ्यात नेमाडे सरांनी जे भाषण केले. मातृप्रेमाविषयी, साहित्य लिखाणाविषयी विचार मांडताना स्वअनुभव जे मांडलेत त्याविषयीची चर्चा आजही अनेक मित्रांकडून ऐकायला मिळत असते. नेमाडे सरांची ऋतुगंध ( कविता संग्रह ), हिरवा चाफा ( कविता संग्रह ), अभंग-वारीचे-दुनियादारीचे आशी पुस्तके प्रकाशित असून शेकडों पुस्तकांना विनामूल्य प्रस्तावना व अभिप्राय देणारा आपला माणूस आपल्यातून निघून गेल्याची हळहळ साहित्य जगतातून व्यक्त केली जात आहे.
भाषाप्रभु प्रा. डाँ. राम नेमाडे सर आणि त्यांच्यासोबत सदैव सावलीसारख्या उभ्या असणाऱ्या त्यांच्या पत्नी मायी मावशी (सरांच्या सौ.) ही जोडी लाखात एकच. यांच्या सहवासात जी कोणी व्यक्ती आली असेल ती तीळ आणि गुळाच्या समिकरणाचा गोड लाडूच समजावा.
जळगावला आखिल भारतीय पहिले लेवा गणबोली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सरांची निवड करण्यात आली होती. नेमाडे सरांच्या लेखणीसह स्वभावाविषयी अनेक प्रतिभावंत साहित्यिक मित्रांकडून माहिती मिळाली असली तरी त्यांचे आशीर्वाद घेण्याचा योग जुळून येत नव्हता. सर डोंबिवली येथे रहात असल्याने त्यांना भेटण्याची उत्सुकता होतीच.
पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्राची आवड मला असल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादरीकरणासाठी निमंत्रण मला असते. लेवा गणबोली भाषेवर बालपणापासून माझे अधिक प्रभूत्व आणि ती भाषा बोलणा-या मित्रपरिवाराचा अतिसहवास. यामुळे लेवा गणबोलीत देखील रचना मी केल्या असल्याने जळगावच्या साहित्य लेवा गणबोली कविता सादर करण्याचे व्यासपीठ मिळणार याबद्दलचे वेगळे समाधान होत. लेवा गणबोली भाषेचे पहिले साहित्य संमेलन आणि ते ही जळगावात म्हटल्यावर आनंद द्विगुणीत झाला. लेवा गणबोली ही भाषा बोलायला सोपी वाटत असली तरी कागदावर मांडणे तशी ती सोपी नाही. जळगाव येथील तुषार वाघुळदे या मित्राच्या माध्यमातून नेमाडे सरांचा फोन नंबर मिळवला. इंडिया २४ तास वेब न्यूजसाठी नेमाडे सरांची जळगावच्या साहित्य संमेलना संदर्भात मुलाखत घेण्याच्या उद्देशातून सरांसोबत प्रथमच त्यांच्या 'राम निवास' बंगल्यात भेट झाली. सोबत माझे मित्र सुचेतन फेगडे होते.
नेमाडे सर आणि मायी मावशी यांच्या प्रथम भेटीतच एवढ्या दिलखुलास गप्पा चर्चा झाल्या की साडे तीन तास कसे गेलेत कळलेच नाही. ओघाओघाने माझ्या रचना मी सादर केल्यानंतर सरांना त्या खूपच भावल्या. अशा प्रकारे सर आणि मायी मावशी या दोघांच्या प्रेमात मला खूप काही माझे भविष्य जाणावले ते ही पहिल्याच भेटीत! पुन्हा दहा बारा दिवसातच सरांच्या घरी पुन्हा जाण्याचा योग आला. सरांच्या सान्निध्यात येऊन साहित्य लिखाण विषयी चर्चा सुरु असताना माझ्या स्वलिखित कवितांची डायरी सरांना दाखवली. ती पाहून कविता संग्रहाचा विषय सरांनीच माझ्यासमोर ठेवला व मला मार्गदर्शन करुन सहकार्य देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता माझ्या कवितासंग्रहाचा.
सरांनी हात पाठीवर ठेवल्याने मला भल्या मोठ्या प्रेरणासह ऊर्जा उभारी मिळाली. माझ्या स्वलिखित "अमृतवेल" कविता संग्रहाला प्रस्तावना भाषाप्रभु राम नेमाडे सरांची लाभली हे माझे अहोभाग्यच. अमृतवेलसाठी दिलेल्या प्रस्तावनेच्या मानधनाबाबत सरांकडे विचारणा केली असता. 'मी पैशांसाठी लिखाण नाही, पैसे देण्याची भाषा करीत असाल तर मी प्रस्तावना देणार नाही'.असे परखड सडेतोड बोल सरांकडून ऐकायला मिळाले. विशेष म्हणजे सरांनी शेकडों पुस्तकांना प्रस्तावना दिल्यात, अभिप्राय दिलेत मात्र एकही प्रस्तावना - अभिप्रायासाठी कोणाकडून एक रुपया देखील कधी घेतला नाही. याला म्हणतात साहित्यासाठी केलेले योगदान. असा हा ज्ञानदानासाठी उभे आयुष्य वाहून घेतलेला निःस्वार्थी माणूस. नाहीतर एखाद्या पुस्तकात अभिप्राय लिखाणासाठी देखील पैशांची मागणी केली जाते.
साहित्याच्या जगतात आज माझे जे स्थान आहे याचे सर्वस्वी श्रेय नेमाडे सरांनाच मी देणार. सरांनी जरी या जगतातून निरोप घेतला असला त्यांचे आशीर्वाद व प्रेरणा माझ्यासोबत असतील. माझे साहित्यातील प्रेरणास्थान असलेले गुरुवर्य राम नेमाडे सरांच्या ' राम निवास 'बंगल्यावर जायचं म्हटलं म्हणजे तीन चार तासांची साहित्य याविषयावरची चर्चा जणू भरीत पार्टीची मेजवानीच असायची. घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे यथोचित आदरातिथ्य चहा-बिस्कीट देऊन मायी मावशींकडून नित्याने केले जाते आणि हास्यमय बोलण्यातून सर आणि मायी मावशी प्रवेशद्वारापर्यंत पोहचविण्यासाठी दोघांचे आवर्जून येणे आणि घरातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य समाधान व जिव्हाळ्याच्या गोडवा नक्कीच घेऊन जाणारा असायचा.
सरांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा नक्की प्राप्त होत असे. अशा प्रकारच्या स्वच्छ प्रतिमेचं मन असलेलं व्यक्तिमत्व आज लाभणे कठीण आहे. आदरणीय राम नेमाडे या तेजोमय दिव्यापासून मिळणाऱ्या प्रकाशाचे महत्त्व समजून घेऊन आणि साहित्य जगतासह समाजहिताची तळमळ ध्यानात घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या माणसांना जपणं व त्यांचा यथोचित सन्मान करणे आपले परमकर्तव्यच समजावे.
सरांची मधूर स्मित मायाळू भाषा आणि विनम्र स्वभाव खरोखरच परमेश्वराने दिलेला अनमोल दागिनाच होता. म्हणूनच ते भाषाप्रभु म्हणून सर्वांना परिचित आहेत. राम नावाला साजेसं त्यांचे एकंदरीत वर्तन प्रत्येकाला आपलंस करणारं नक्कीच होते. प्रत्येकाच्या हृदयात "आपला माणूस" म्हणून नेमाडे सरांची प्रतिमा निर्माण आहे. तसेच त्यात साखरेचा गोडवा निर्माण करणाऱ्या मायी मावशींचाही सिंहाचा वाटा आहे, हे विसरुनही चालणार नाही.
रंगलेल्या गप्पांच्या ओघाओघात ते आपल्या जीवनातील अनेक प्रसंग मांडत असत. प्रभू श्रीरामासारखा स्मितभाषी व सरळ मार्गाने कोणाला न दुखावतांना प्रवास करणाऱ्या चांगल्या माणसाला देखील त्यांच्या जीवनात अनेक यातनांना सामोरे जावे लागले. त्या सर्वांधिक दुःखदायक घटना म्हणजे त्यांचा मुलगा सत्यजित उर्फ राजेश यांचा मृत्यू होणे. त्याच्या जाण्याचे शल्य सरांच्या बोलण्यातून ओघाओघाने जाणवायचे.
जळगाव येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय लेवा गणबोली भाषेचे जे साहित्य संमेलन झाले त्यात त्यांनी आर्थिक योगदान दिले होते. मात्र यातील सावळा गोंधळ, नियोजनाचा अभाव व हिशोबाचा ताळमेळ न झाल्याने ते मोठ्या प्रमाणावर दुखावल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. त्यानंतर झालेल्या लेवा गणबोली भाषेच्या साहित्य संमेलनापासून नेमाडे सरांसह अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी लांब राहणेच पसंत केले. अशा प्रकारे अनेकांनी त्यांचा वापर केला आणि त्यांच्याकडे नंतर दुर्लक्ष केल्याचे प्रसंग सरांनी मनमोकळेपणाने सांगितलेत. नेमाडे सरांना अनेकांकडून वाईट वागणूक मिळाली असली तरी त्याचा गाजावाजा त्यांनी न करता आपला ज्ञानदानासह माणसे जोडण्याचा प्रवास मात्र निरंतर सुरुच ठेवला होता. त्यांनी कधी कोणाला दुखावले असेल असे वाटत नाही.
ज्ञानदानासाठी उभे आयुष्य राम नेमाडे सरांनी वाहून घेतले त्यामुळे त्यांच्या अगाढ ज्ञानासह प्रगल्भतेला जोड नव्हती. 'अभंग-वारीचे-दुनियादारीचे' या त्यांच्या पुस्तकात अतिशय सोप्या व साध्या भाषेत त्यांनी अभंग रचना केली आहे. या पुस्तकात ते लिहितात 'महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा अजूनही बहुअंशी पूर्वीइतकाच शुध्द राहिला आहे. . येथे भक्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. संपत्ती व शक्ती प्रदर्शना येथे वाव नाही. त्यामुळे शेतकरी, कामगार, सर्वसामान्य भक्त भक्तीभावाने प्रेरित होऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी दिंडीतून मैलोमैल पायी चालत पंढरपूरात जमतात. कोणाला कोणाचा हेवा वाटत नाही. प्रतिष्ठेचा दिखाऊपणा नाही. पांढराशुभ्र कुडता, धोतर, पांढरी टोपी, असा साधा पोशाख. मस्तकी टिळा, गळ्यात तुळशीचा माळ, टाळ, विणा, मृदंगाच्या तालावर भक्तीरसात आकंठ बुडालेला, भजन-कीर्तनाचे वेड असलेला हा वारकरी जत्था पाहिला की अहंकाराचे कवच आपसुक गळून पडते. जातपात, पंथ, आदिंच्या पलिकडे जाऊन, भूक-तहानेचा विसर पडून लाखोंच्या संख्येने स्त्री-पुरुष वारकरी नाचत आसतात असा हा एकात्मता साधाणारा वारकरी मला जवळचा वाटतो. याच श्रध्देतून मी काही अभंग वारीला, विठ्ठलाला समर्पित केले आहेत. ते भाविकांना नक्कीच आवडतील, अशी खात्री मला वाटते'.
माझा स्वलिखित दुसरा येऊ घातलेला 'दिवा तुळशीरामाचा' कवितासंग्रहाला ते प्रस्तावना देऊन गेलेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या पंधरा दिवसांपूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी माझ्या परिवाराला त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यावेळी सरांना डोळ्यांचा थोडा त्रास देखील जाणवत होता. स्वयंपाक न करण्याचे मी फोन करुन सांगून देखील मायी मावशींनी स्वयंपाक तयार करुन ठेवल्याचे गेल्यानंतर समजले. याप्रसंगी 'दिवा तुळशीरामाचा' कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा यासह अनेक विषयांवर मनमुराद गप्पा सरांसोबत झाल्या. रोझोदा या माझ्या गावी प्रकाशन सोहळ्याला आवर्जून येण्याबाबतचे आश्वासन सरांनी दिले होते. सरांसोबतची ती भेट म्हणजे अखेरचीच ठरली. माझ्या जीवनातील मोठी आधारस्तंभ तसेच माझ्या लेखणीचा कणा ९ जानेवारी २०२४ मंगळवार रोजी दुपारी हरपला.
माझ्या लेखणीचा कणा आज हरपला
माझ्या साहित्याचा बाप अनंतात विलीन हो झाला.
साखरेलाही फिके पाडणारा भाषाप्रभु अबोल झाला
आधारस्तंभ माझ्या लेखणीचा बाय-बाय करुन गेला.
मनाचा दिलदार शब्दांचा बादशहा सर्वांना पोरका करुन गेला
अश्रूंच्या नदीला आज डोंबिवलीत महापूर हो येऊन गेला.
केला नाही कधी स्वलेखणीचा कुठे गवगवा
असा विचारवंत प्रज्ञावंत विचारांचा खजीना देऊन हो गेला.
सरजी आप बहुत याद आओगे ll
भाषाप्राभु प्रा. डाँ. राम नेमाडे सरांना भावपूर्ण श्रध्दांजली
राजेंद्र चौधरी.
रोझोदा.ता.रावेर.जि.जळगाव
मो.९४२३४७२७६५

कोणत्याही टिप्पण्या नाहीत