८ महिन्यांचे बाळाला झोळीतून उचलून चोरटे फरार साकेगाव स्मार्ट व्हीलेजमधील सर्व सीसीटीव्ही बंद, शोधार्थ तीन पोलिस पथके मागावर
८ महिन्यांचे बाळाला झोळीतून उचलून चोरटे फरार
साकेगाव स्मार्ट व्हीलेजमधील सर्व सीसीटीव्ही बंद, शोधार्थ तीन पोलिस पथके मागावर
लेवाजगत न्यूज भुसावळ-तालुक्यातील साकेगाव येथील लेंडीपुरा भागात घरी झोळीत झोपलेल्या ८ महिन्यांच्या मुलाला दोघांनी पळवून नेले. २३ एप्रिलच्या पहाटे १.३० ते २ वाजेदरम्यान ही घटना झाली. अरविंद अर्जुन भील असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. दरम्यान, स्मार्ट व्हिलेज असा टेंभा मिरवणाऱ्या साकेगावातील ग्रा.पं.चे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने बालकास पळवणाऱ्यांना शोधणे आव्हानात्मक झाले आहे.
अर्जुन भिल हे पत्नी रंजिता आणि ८ महिन्यांचा मुलगा अरविंद यांच्यासोबत साकेगाव येथील लेंडीपुरा भागात राहतात. सोमवारी रात्री अर्जुन कामानिमित्त बाहेर होता. तर पत्नी रंजिता ही बाळासह घरी होती. तीने नेहमीप्रमाणे झोळीत अरविंदला झोपायला टाकले होते. तापमानामुळे उकाडा होत असल्याने घराचा दरवाजा उघडा होता. मंगळवारी पहाटे १.३० ते २ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या दोघांनी घरात शिरून झोळीतील बाळाला उचलून पळवून नेले. यावेळी बाळाने रडायला सुरूवात करताच आई रंजिताला जाग आली. ती घरातून बाहेर येईपर्यंत दोघांनी बाळाला घेऊन दुचाकीवरून धूम ठोकली. रंजिता यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला. अपर पोलिस अधीक्षक अशोख नखाते, डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, एलसीबीचे निरीक्षक किसन नजन पाटील, निरीक्षक बबन जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली.
फुटेजसाठी तपासले पोलिसांनी कॅमेरे
या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी बुधवारी दिवसभर ग्रा.पं.ने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून फुटेज मिळते का? याची तपासणी केली. पण, स्मार्ट व्हिलेज असा टेंभा मिरवणाऱ्या साकेगाव ग्रामपंचायतीचा एकही सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आढळला नाही. यामुळे पोलिसांनी खबऱ्यांमार्फत तपास सुरू केला. पोलिसांची तीन पथके विविध ठिकाणी रवाना केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत