ईव्हीएम मशीनची ने-आण केलेल्या बसमधून विद्यार्थ्याला सिटखाली सापडले ५०० च्या नोटांचे बंडल
ईव्हीएम मशीनची ने-आण केलेल्या बसमधून विद्यार्थ्याला सिटखाली सापडले ५०० च्या नोटांचे बंडल
वृत्तसंस्था अहिल्यानगर -विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या एक दिवस आधी निवडणूक कामांत वापरण्यात आलेल्या एका बसमधून ५०० च्या नोटांचे दोन बंडल सापडली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या एका विद्यार्थ्याने प्रमाणिकपणा दाखवत ही रक्कम वाहकाकडे सुपूर्द केली. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
कोपरगाव आगाराची बस एमएच ४० वाय ५६७९ या क्रमांकाची बस स्ट्रॉंग रूमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रापर्यंत जाऊन आली. त्यानंतर त्याच बसने गुरुवारी वैजापूर कोपरगाव अशा बस फेऱ्या केल्यानंतर संध्याकाळी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथून विद्यार्थ्यांना घेऊन ही बस धामोरीच्या दिशेने जात असताना बसच्या शेवटच्या सीटाखाली प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपयांच्या नोटांचे दोन बंडल मिळून आले. ही रक्कम ८६ हजार पाचशे रुपये एवढी असल्याची माहिती आहे.
विद्यार्थ्यांनी हे पैसे एसटी बसच्या वाहक सविता आडांगळे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर सविता आडांगळे यांनी बस डेपो मॅनेजर अमोल बनकर यांनाही याबाबत माहिती देऊन ती रक्कम बस डेपोत नेऊन जमा केली. प्रशासनाने निवडणूक कामासाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
एसटी आगार व पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. ही रक्कम नेमकी कोणाची आहे? बसच्या सीटखाली कशी आली? कोणत्या कामासाठी ही रक्कम बसमधून नेण्यात येत होती, याचाही तपास करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत