जुनी सांगवी येथे डॉ.लीलाधर पाटील लिखित संस्कार पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
जुनी सांगवी येथे डॉ.लीलाधर पाटील लिखित संस्कार पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
लेवाजगत न्यूज सांगवी- येथील लेवा पाटीदार मित्र मंडळ, यांच्या वतीने डॉ. लीलाधर पाटील लिखित संस्कार पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. जुनी सांगवी येथील डॉल्फिन कार्यालयात स्नेह मेळावा संपन्न झाला. माणसाचे वागणे कुटुंब घडवते, समाज घडवते, राष्ट्र घडवते या जडणघडणीलाच संस्कार म्हणतात, असे विचार अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ साहित्यिक विनोद इंगळे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विजय शेठ जगताप,(उद्योजक) माजी नगरसेवक नामदेव ढाके, मां.माई ढोरे मां.महापौर .शारदा सोनवणे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे,(मां.नगरसेवक) एल सी सी आय ए (पी सी एम सी चाप्टरचे) अध्यक्ष भूषण गाजरे, समता भातृ मंडळाचे अध्यक्ष हेमंत झोपे, डॉ.लीलाधर पाटील, डॉ. निळकंठ पाटील, भागवत झोपे, सुरेश भोळे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तन्वी पाटील, लीना बोरोले, भूषण फेगडे, रोहन फेगडे, पियुष फेगडे या उद्योजकांचा यावेळेस यथोचित सत्कार करण्यात आला.
इंगळे पुढे म्हणाले, आई वडील आपल्या आयुष्याच्या गाडीचे दोन चाके असतात. त्यातल्या एकाला खूप किंमत आहे आणि दुसऱ्याला नाही असे नसते. आई संस्कार देते, तर वडील कर्तव्याची जाणीव देतात. आई प्रेमाची ऊब असते, तर बाबा जगण्यासाठी लागणारा कणखरपणा असतात. माता पित्याची किंमत ज्यांना छत्र मिळत नाही त्यांना लवकर कळते. आई-बाबा आपल्या आयुष्याला पुरणारे नसतात, पण आहे तोवर त्यांचा सन्मान आणि त्यांनी केलेल्या आपल्या सुखासाठीच्या त्यागाची किंमत आपण ठेवावी.
प्रमुख पाहुणे आणि पाटीदारांवर संशोधन केलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निळकंठ पाटील म्हणाले, भारतीय शास्त्राप्रमाणे प्रत्येक कृतीच संस्कारातून संस्कारयुक्त असली पाहिजे. प्रत्येक कार्य चांगले संस्कार युक्त असले पाहिजे. उदा. केळी खाऊन आपण सालपट बाहेर फेकतो ही कृती आहे. केळी खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकतो ती प्रकृती (मूळ स्वभाव) आहे. साल रस्त्यावर टाकने ही विकृती आहे. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकतो ही संस्कृती आहे.
मंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे यांनी प्रास्ताविक, पंकज पाटील आणि उर्मिला पाटील यांनी बहारदार सूत्रसंचालन, महेश बोरोले यांनी आभार ख्याती अत्तरदे आणि तनया अत्तरदे यांनी गणेश वंदना सादर केली. देवेंद्र पाटील, संजय भंगाळे, विलास पाटील, रवींद्र पाटील, प्रेमचंद पाटील, नथुराम भोळे, भूषण गाजरे यांनी संयोजन केले.
महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा म्हणजेच कोण बनेगा बक्षीस पती हा खेळ घेण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सुग्रास खानदेशी भोजनाचा ६००शे बांधवांनी लाभ घेतला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत