Header Ads

Header ADS

लाचखोरीच्या प्रकरणात मंडळ अधिकारी आणि तलाठी जेरबंद

 

Board officer and Talathi arrested in bribery case


लाचखोरीच्या प्रकरणात मंडळ अधिकारी आणि तलाठी जेरबंद

 लेवाजगत न्यूज अलिबाग: लाचखोरीच्या प्रकरणात अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील मंडळ अधिकारी आणि तलाठी जेरबंद झाले. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. विजय मापुस्कर आणि वसुंधरा धुमाळ अशी या दोन लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत.


रेवदंडा आगरकोट येथे राहणाऱ्या महिलेने एकूण सहा सर्वे नंबर मधील त्यांच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी कागदपत्र जमा केली होती. ही वारस नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी विजय मापुस्कर आणि तलाठी वसुंधरा धुमाळ यांनी प्रत्येकी पाच रुपये लाचेची मागणी केली.


मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून ५ मे रोजी लाचेची मागणी झाल्यानंतर सदर महिलेने याबाबतची तक्रार रायगडच लाचलुचपत विभागाकडे नोंदवली. ६ मे रोजी प्रकरणाची पडताळणी करण्यात आली. ज्यामध्ये दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रत्येकी पाच हजार आणि एकूण दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सात मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला.



आरोपी तलाठी वसुंधरा धुमाळ यांनी पंचांच्या समक्ष तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली. तर मंडळ अधिकारी विजय मापुस्कर यांनी त्यांच्या लाचेची रक्कम नंतर आणणेबाबत इशारा केला. तलाठी वसुंधरा धुमाळ या लाचेची रक्कम घेऊन कार्यालयातून बाहेर पडत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले. आणि त्यांच्याकडील लाचेची रक्कम हस्तगत केली. मंडलाधिकारी मापुस्कर यांनी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नसली तरी पडताळणी दरम्यान लाच स्वीकारण्याचे कबूल केले असल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांनाही उद्या अलिबाग येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.


दोघांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे अशी माहिती पोलीस उपाधीक्षक शशिकांत पाडावे यांनी दिली. सहाय्यक फौजदार विनोद जाधव, अरुण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील, सुषमा राऊळ, सचिन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.


शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांच्या वतीने खाजगी इसम शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची रक्कम मागत असल्यास नागरिकांनी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. तक्रारदार यांची माहिती गुप्त ठेवली जाईल असे आवाहन पोलीस उपाधीक्षक शशिकांत पडावे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.