Header Ads

Header ADS

मुंबईची जीवनवाहिनीच ठरली काळ: मुंब्रा-दिवा दरम्यान लोकलमधून पडून ५ प्रवाशांचा अंत, ३ गंभीर


मुंबईची जीवनवाहिनीच ठरली काळ: मुंब्रा-दिवा दरम्यान लोकलमधून पडून ५ प्रवाशांचा अंत, ३ गंभीर


लेवाजगत न्युज मुंबई: मुंबईतील लोकल ट्रेनमधील जीवघेण्या गर्दीने आज पुन्हा एकदा पाच जणांचा बळी घेतला आहे. सकाळी कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांना खचाखच भरलेल्या कसारा-सीएसएमटी लोकलच्या दरवाज्यातून प्रवास करणे जीवावर बेतले. दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकलचा धक्का लागल्याने आठ प्रवासी रुळांवर फेकले गेले, ज्यात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नेमके काय घडले ?


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) येणारी लोकल प्रवाशांनी पूर्णपणे भरली होती. जागेअभावी अनेक प्रवासी पाठीवर बॅगा घेऊन दरवाज्यात जीव मुठीत धरून उभे होते.
त्याचवेळी, दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान ज्या ठिकाणी दोन रेल्वे रुळांमधील अंतर अतिशय कमी आहे, तिथूनच सीएसएमटीच्या दिशेने एक डाउन लोकल वेगाने गेली. या दुसऱ्या लोकलचा धक्का दरवाज्यात लटकणाऱ्या प्रवाशांना आणि त्यांच्या बॅगांना बसला. यामुळे त्यांचा तोल जाऊन ते धावत्या लोकलमधून खाली कोसळले.

प्रशासनाची धावपळ


अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने हालचाल केली. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले की, "लोकलमधील प्रवासी आणि गार्ड यांनी साडेनऊच्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका आणि रेल्वे कर्मचारी-अधिकारी सकाळी ९.५० पर्यंत घटनास्थळी पोहोचले." सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातामुळे मुंबई लोकलच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि गर्दीच्या नियंत्रणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.