“तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत!” – भाजपा आमदार बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य
“तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत!” – भाजपा आमदार बबनराव लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य
जालना प्रतिनिधी | लेवाजगत न्यूज |भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. एका गावातील टीकाकारांवर बोलताना त्यांनी केलेली टीका इतकी अतिरेकी होती की, ती आता संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण करत आहे.
एका सभेत बोलताना लोणीकर म्हणाले, “तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान मोदींनी दिले, तुझ्या आई, बहिणी आणि बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे दिले. तुझ्या अंगावरचे कपडे, पायातील बूट, हातातील डबडं – हे सगळं आमच्यामुळे आहे. आणि तरीही तू आमच्यावर टीका करतोस?”
या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून विरोधकांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अंबादास दानवे यांचा संताप
शिवसेना (ठाकरे गट) आमदार अंबादास दानवे यांनी या वक्तव्याचा निषेध करत लिहिलं, “ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! बबनराव, तुमचे कपडे, बूट, डिझेल, विमानाची तिकिटं – हे सगळं जनतेमुळेच आहे. जनतेमुळेच तुमचं आमदारपद आहे. ही भाषा लोकशाहीस अपमानित करणारी आहे. निवडणुकीत जनता हे लक्षात ठेवेल.”
काँग्रेसकडून निलंबनाची मागणी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “हे वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. लोणीकरांनी किती लोणी-तूप खाल्लं, हे राज्याला माहिती आहे. त्यांनी तात्काळ माफी मागावी किंवा भाजपाने त्यांना निलंबित करावं. अन्यथा आम्ही त्यांना कुठल्याही गावात फिरू देणार नाही.”
राजकीय पडसाद वाढणार?
या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा वक्तव्यांमुळे जनतेत रोष वाढू शकतो. सत्ताधारी भाजपने या प्रकरणावर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
[अधिक अपडेटसाठी आमचे चॅनल फॉलो करा]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत