"अश्लील फोटोची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत"
"अश्लील फोटोची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अटकेत"
लेवाजगत न्यूज अकोला:
राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. अकोला जिल्ह्यातील पिंजर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन वर्षांपासून मानसिक व शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पिंजर आणि चांनी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
अंधारसांगवी (ता. पातूर) येथील सुनील गजानन देवकर (वय २५) याने २०२२ पासून पीडितेचा पाठलाग सुरू केला होता. एकदा त्याने तिला दुचाकीवरून जबरदस्तीने वाघागड येथील जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिला वारंवार त्रास देत राहिला.
पीडिता दीर्घकाळ भयभीत राहून गप्प होती. मात्र, अत्याचाराचा कळस झाला तेव्हा तिने धाडस दाखवत पिंजर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार पिंजर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून चांनी पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीला अटक केली.
शाळेतही छळ सुरूच...
शिक्षणासाठी अकरावीत प्रवेश घेतल्यानंतरही आरोपीने तिचा पाठलाग थांबवला नाही. तो शाळेजवळ येऊन तिला धमकावत होता आणि शारीरिक अत्याचार करत होता. या त्रासामुळे मुलीवर मानसिक ताण वाढला होता. अखेर तिने धाडस दाखवत पोलिसांकडे आपबिती कथन केली.
या प्रकरणाचा तपास एपीआय गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत