“मी समोरून लढणारा माणूस आहे”-गिरीश महाजनांना खडसेंचे थेट आव्हान
“मी समोरून लढणारा माणूस आहे”-गिरीश महाजनांना खडसेंचे थेट आव्हान
लेवाजगत न्यूज जळगांव- "महाराष्ट्रात सध्या गाजत असलेला हनीट्रॅपचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. यावरून विरोधकांनी आता सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी गंभीर आरोप केला आहे. प्रफुल लोढा यांच्याकडे असलेले मटेरियल त्यांनी इतरांना देऊ नये आणि तोंड उघडू नये यासाठी त्यांना वारंवार पोलिस कोठडीत ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. तसेच प्रफुल लोढा जर बाहेर आले किंवा जामिनावर आले तर, त्यांच्याकडून सत्य निघाल्यास याचा पर्दाफाश होऊ शकतो, असा दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे."
"एकनाथ खडसे म्हणाले, मी जे आहे ते उमद्या मनाने करणारा माणूस आहे, मी मागून करणारा माणूस नाही, असे म्हणत त्यांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच याला जेलमध्ये टाका, याच्या मागे ईडी लावा, असे करणाऱ्यातला, अशातला मी माणूस नाही. लढायचे असेल तर आमने-सामने लढा, असे आव्हान देखील खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिले आहे."
"एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती की, मला खडसे यांचा राग येत नाही. पण, त्यांची कीव येते, असे म्हणत त्यांनी खडसे यांच्यावर टीका केली होती. त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर देत म्हटले होते की, जोपर्यंत देवाभाऊंचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजन यांची किंमत आहे, एकदा देवेंद्रजी यांनी डोक्यावरचा हात काढला की गल्लीमध्ये एक कुत्र्याच्या मागे जशी 100 कुत्रे लागतात तशी याची हालत होणार आहे, अशी बोचरी टीका खडसे यांनी केली आहे."
"पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, आतापर्यंत लढलो मी ते समोरून लढलो, मागून काड्या केल्या नाही असे खडसेंनी सुनावले. हा जो प्रफुल्ल लोढा आहे, तो गिरीश महाजन यांच्या बंगल्यामध्ये सातत्याने राहायचा. महाजन मंत्री असताना त्यांच्यासोबत तो रहायचा, यात पुरावा देण्याची काही गरज नाही कुणीही सांगू शकेल."
"तसेच मी असे कधीच म्हटले नाही की मला लोढा भेटला नाही. मी पहिल्या मुलाखतीतच म्हटले होते की माझा सुद्धा त्याच्यासोबत फोटो असू शकतो, असे एकनाथ खडसे म्हणाले. माझा मूळ विषय हाच आहे की नाशिकच्या आणि ट्रॅपच्या प्रकरणांमध्ये कोणकोण आहे त्याचे मूळ शोधणे. यातला एक जण आपल्या विभागातला आहेच मी त्या पर्यंत लवकरच पोचेल आणि हा विषय शेवटपर्यंत नक्कीच जाईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला."
"गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याची टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना खडसे म्हणाले, तुम्हाला काय वाटते मानसिक संतुलन माझे बिघडले की गिरीशचे बिघडले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विधानसभेत मी आवाज करतो तर अच्छे-अच्छे की चड्डी गिली हो जाती हें, हे तुम्ही बघितले आहे. गिरीश भाऊंची चांगली ख्याती आहे. सर्वांनाच माहिती आहे, त्यांच्यावर चांगल्या चांगल्या कॉमेंट्स येतात. हनीट्रॅप प्रकरणांमध्ये बऱ्याचदा रामेश्वर नाईक याचे सुद्धा नाव घेतले गेले, असा गंभीर आरोप सुद्धा एकनाथ खडसे यांनी केला."
"एकनाथ खडसे म्हणाले, ज्यावेळी प्रफुल लोढा यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी रामेश्वर नाईक हा त्या ठिकाणी उपस्थित होता. रामेश्वर नाईक यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती असे प्रफुल लोढा यांनी म्हटले आहे आणि धमकी देणारेच आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आहेत. त्यामुळे या प्रकरणावर दबाव राहण्याची भीती आहे. किती सत्य समोर येईल हे मला माहित नाही, पेन ड्राईव्हमध्ये जर एखादा मंत्री दिसत असेल तर ते नष्ट होईल अशी सुद्धा मला भीती आहे, असा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे."
"एकनाथ खडसे म्हणाले, आता जर तुझ्या ताकद असेल आणि तुझ्यात हिम्मत असेल, खऱ्या अर्थाने तुझी पत वरच्या बाजूला असेल, माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी कर, असे म्हणत खडसे यांनी खुले आव्हान महाजन यांना दिले आहे. माझ्या मुलाच्या आत्महत्येची तसेच खुनाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करावी, मी तयार आहे. जोपर्यंत देवा भाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजन याची किंमत आहे."
"गिरीश महाजन जे काही प्रश विचारतात त्याची माहिती त्यांना नसते. आम्ही मंत्री आहोत आणि याच्या माध्यमातून कितीतरी उद्योग करायचे आणि पैसे कामवायचे असे कितीतरी उदाहरणे दाखवता येतील. मंत्री गिरीश महाजन यांचा असा काय व्यवसाय आहे, ते पेन्शनर माणसाच्या मुलाकडे एवढी मोठी संपत्ती कशी आली? हनी ट्रॅप मध्ये अटक केलेल्या प्रफुल लोढा याची घटनेनंतर पंधरा दिवसानंतर अंधेरी पोलिस ठाण्यात कशी नोंद झाली? घटना घडली ती तारीख आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला ती तारीख यामध्ये १५ दिवसांचा फरक आहे पंधरा दिवस गुन्हा दाखल करण्यासाठी का लागले? असे अनेक सवाल खडसे यांनी उपस्थित केले."
"तसेच माझा सरळ आक्षेप आहे की प्रफुल लोढा याच्याकडून काही मिळण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते नष्ट करण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्याकडून काहीतरी मिळेल म्हणूनच त्याला छळणे सुरू आहे असे सुद्धा एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. लोढा याच्याकडून पुरावे घ्यायचे आहेत आणि ते पुरावे नष्ट करायचे आहेत, असा गंभीर आरोप देखील खडसे यांनी केला आहे"

कोणत्याही टिप्पण्या नाहीत