Header Ads

Header ADS

"आमच्याकडे गवताचे पाते आले तरी तलवार बनवण्याची क्षमता!"-आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत

aamchyakade-gavatache-pate-alele-tari-talwar-banvanyachi-kshamata-mahendrasheth-gharat


"आमच्याकडे गवताचे पाते आले तरी तलवार बनवण्याची क्षमता!"-आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत

उरण (प्रतिनिधी – सुनिल ठाकूर):
"आमच्याकडे गवताचे पाते आले तरी तलवार बनवण्याची क्षमता आहे. म्हणूनच आम्ही सन्मानाने जगतो आणि इतरांनाही सन्मान देतो," असे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी व्यक्त केले. ते बोकडवीरा काँग्रेस कमिटीचे नेते, न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष जयवंत गंगाराम पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळ्यात बोलत होते. हा कार्यक्रम सोमवारी (ता. १९) जेएनपीटी वसाहतीतील मैदानात उत्साहात पार पडला.

घरत म्हणाले, "आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, पण वैरभावाने कधीच वागलो नाही. आमच्याकडे माणसे येतात, त्यांना प्रोत्साहन देतो, त्यामुळेच अनेकांनी उंच भरारी घेतली. जयवंत पाटील त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत माणुसकी आणि समर्पण यांचा संगम आहे."

ते पुढे म्हणाले, "जयवंत पाटील कुटुंबवत्सल असून त्यांच्या सुनामुलांनी त्यांच्याविषयी केलेले कौतुक हे अत्यंत भावनिक आहे. त्यांच्या आयुष्यात कमावलेल्या माणसांनी दिवाळीच्या सणातही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली, हे त्यांच्या लोकप्रियतेचे प्रतीक आहे. मी ब्राझीलवरून थेट शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे, कारण जयवंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यात कामगारांसाठी केलेले कार्य अमूल्य आहे."

कार्यक्रमात जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील म्हणाले, "जयवंत पाटील अतिशय विनोदप्रिय स्वभावाचे आहेत. सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांशी ते सौहार्दाने वागतात; मात्र काँग्रेसशी निष्ठा कायम राखतात."
तर उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील म्हणाले, "जयवंत माझा केवळ मित्र नव्हे, तर मोठा भाऊ आहे. माझ्या राजकीय वाटचालीत तो नेहमीच माझा पाठीराखा राहिला आहे."

कार्यक्रमादरम्यान जयवंत पाटील यांना त्यांच्या मुलांनी आलिशान गाडीतून व्यासपीठावर आणले, त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट आणि फटाक्यांची आतषबाजी झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचा भव्य झेंडा फडकावून जयवंत पाटील यांना सलामी दिली. जेएनपीटी वसाहतीतील मैदान खचाखच भरलेले होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, महाराष्ट्र फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, रायगड भूषण एल.बी. पाटील, शिक्षक नेते नरसू पाटील, वैभव पाटील, किरीट पाटील आदींचा समावेश होता.

अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून जयवंत पाटील यांच्या समर्पित कार्याचा आणि कर्तृत्वाचा गौरव केला.
कार्यक्रमाचा शेवट जयवंत पाटील यांच्या आयुष्यावर आधारित प्रेरणादायी भाषणांनी आणि कृतज्ञतेच्या भावपूर्ण वातावरणात झाला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.