भुसावळात पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण उघडकीस तांत्रिक विश्लेषण व पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुकली सुखरूप सापडली; आरोपी अटकेत
भुसावळात पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण उघडकीस
तांत्रिक विश्लेषण व पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुकली सुखरूप सापडली; आरोपी अटकेत
लेवा जगत न्यूज – भुसावळ-भुसावळ शहरातील बस स्टँड रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्र (ATC) समोरून एका पाच वर्षीय मुलीचे अपहरण करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे.
दिनांक 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास फिर्यादी काजल मुन्ना ठाकुर (वय 29, रा. भाखा अमरपूर, जि. दिंडोरी, म.प्र.) यांच्या पाच वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 491/2025, भा.द.वि. कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची दिशा शोधली. त्यातून गोरेलाल भगवानसिंग कछवे उर्फ भिलाला (रा. अजदरा) हा आरोपी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला उजनी देवस्थान (ता. बोदवड) येथून ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत मुलीचे भिक मागण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ हालचाल करून चिमुकलीला आरोपीच्या ताब्यातून सुखरूप परत मिळवले आणि तीला आईकडे परत दिले.
तपासादरम्यान असेही निष्पन्न झाले की, आरोपीवर यापूर्वीही चैनपूर पोलीस स्टेशन (जि. खरगोन, म.प्र.) येथे भा.द.वि. कलम 363 अंतर्गत गुन्हा नोंद आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, आणि त्यांच्या पथकातील सर्व पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांचा समावेश होता.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल रमण सुरळकर हे करीत आहेत.
पोलिसांच्या तात्काळ व प्रभावी कारवाईमुळे चिमुकलीचा जीव वाचला — नागरिकांकडून पोलिस दलाचे कौतुक!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत