शिक्षणात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश: जळगावात मुख्याध्यापकांना नोटिसा!
शिक्षणात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश: जळगावात मुख्याध्यापकांना नोटिसा!
लेवाजगत न्यूज, जळगाव :
जळगाव जिल्ह्यातील शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. पडताळणी न करता परस्पर शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती केल्याच्या आरोपावरून जिल्ह्यातील १० शाळांच्या मुख्याध्यापकांना नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
या शाळांकडून सर्व आवश्यक कागदपत्रे यापूर्वीच ताब्यात घेण्यात आली होती. नोटिसा बजावल्याने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षण आयुक्तांनी याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून, विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. याआधी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तत्कालीन लेखाधिकारी उदय पंचभाई आणि माध्यमिक वेतन पथकाचे अधीक्षक राजमोहन शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले होते.
संबंधित ६८ संशयितांची सुनावणी लातूर येथे पार पडली असून, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, एरंडोल, चोपडा, मुक्ताईनगर तालुक्यातील शाळांचा यात समावेश असल्याचा संशय आहे.
नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने पुन्हा जळगावात दाखल होऊन संबंधित मुख्याध्यापकांना हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. काहींनी अनुपस्थित राहिल्याने त्यांना शुक्रवारी पुन्हा नोटिसा देण्यात येणार आहेत.
दरम्यान, २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी असतानाही काही शैक्षणिक संस्थांनी संगनमताने शालार्थ आयडी घोटाळा करून बेकायदेशीर भरती केल्याचा आरोप शिक्षण बचाव कृती समितीने केला आहे. समितीने दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत