मुंबई–भुसावळ रेल्वेमार्गावर मोठी घटना : मध्यरात्री सिग्नल केबल कापली; तातडीच्या दुरुस्तीने अनर्थ टळला
मुंबई–भुसावळ रेल्वेमार्गावर मोठी घटना : मध्यरात्री सिग्नल केबल कापली; तातडीच्या दुरुस्तीने अनर्थ टळला
कापलेल्या केबलमुळे ५ गाड्या थांबल्या;
प्रतिनिधी जळगाव-
मुंबई–भुसावळ रेल्वेमार्गावर शनिवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना टळली. गिरणा पंपिंग रस्त्याजवळील अंडरपास पुलावर (ब्रिज क्रमांक ४१५/A) अज्ञात भामट्याने सिग्नलची २० ते २५ मीटर केबल कापून चोरीचा प्रयत्न केला. हा प्रकार रात्री १.३० वाजताच्या सुमारास घडला.
घटना सिग्नल व टेलिकॉम विभागाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने गँगमनला पाठवून पडताळणी करण्यात आली. केबल पूर्णपणे कापल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जुनी केबल काढून नवीन केबल टाकली आणि पहाटे २.३० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.
दरम्यान, सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ५ रेल्वेगाड्या विविध ठिकाणी थांबवण्यात आल्या. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर त्यांना उशिराने मार्गस्थ करण्यात आले.
सिग्नल व टेलिकॉम विभागाचे एसएसई राहुल खरे यांनी ही माहिती दिली.
आरपीएफची तात्काळ दखल
पहाटे ४ वाजता मेमो मिळताच आरपीएफ निरीक्षक अमित यादव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असून चोरीसाठी कापलेली केबल ताब्यात घेण्यात आली आहे.
मोठा धोका टळला
घटनास्थळ जळगाव स्टेशनपासून साधारण ४–५ किमी अंतरावर आहे. या ठिकाणापुढे रेल्वे ट्रॅकवर मोठे वळण असून त्यासाठी स्वतंत्र सिग्नल प्रणाली आहे. केबल कापल्याने हा सिग्नल बंद पडला होता.
सिग्नल न मिळाल्यास एखादी गाडी थेट स्टेशनवर पोहोचून दुसऱ्या गाडीवर धडकण्याची शक्यता होती. तात्काळ दुरुस्तीमुळे हा अनर्थ टळला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत