भुसावळजवळ तापी नदीत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला भावाच्या मृत्यूवर संशय; सखोल चौकशीची कुटुंबीयांची मागणी
भुसावळजवळ तापी नदीत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला
भावाच्या मृत्यूवर संशय; सखोल चौकशीची कुटुंबीयांची मागणी
भुसावळ | दि. १७ डिसेंबर २०२५ :
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील २० वर्षीय इंजिनीअरिंग डिप्लोमाचा विद्यार्थी हितेश सुनिल पाटील याचा मृतदेह आज च्या पात्रात आढळून आला. ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली आहे.
हितेश हा १३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८ वाजता येथील रामानंद नगरमधील भाड्याच्या रूमवरून कोणालाही न सांगता बेपत्ता झाला होता. त्याच्या बेपत्तेची तक्रार त्याचा मोठा भाऊ रितेश सुनिल पाटील (वय २३, व्यवसाय शेती) यांनी १५ डिसेंबर रोजी येथे दिली होती.
पोलीस सूत्रांनुसार, बेपत्ता होण्यापूर्वी हितेशने रूममेट्सना काहीही न सांगता मोटारसायकलने निघण्याआधी मित्र मोहित पाटील याला फोन करून, “मी ज्या मुलीशी प्रेम करतो, तिच्या वडिलांनी माझ्याविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे,” असे सांगितले होते. त्यानंतर त्याने मोबाईल बंद केला. शनिवारी रात्री २:३३ वाजेपर्यंत फोन सुरू होता; त्यानंतर तो बंद झाला असून मोबाईल अद्याप गहाळ आहे.
कुटुंबीयांनी जळगाव, तापी पूल (भुसावळ) आणि विवरा खुर्द परिसरात शोधमोहीम राबवली; मात्र त्याचा शोध लागला नाही. १४ डिसेंबर रोजी हितेशची मोटारसायकल तापी पुलावर उभी अवस्थेत आढळून आली होती. ती भुसावळ शहर पोलिसांनी ताब्यात घेतली.
आज दुपारी तापी नदीच्या पात्रात पाण्यावर तरंगताना हितेशचा मृतदेह आढळला. मृतदेहाचे शवविच्छेदन भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल प्रलंबित आहे. हितेश हा त्रिमूर्ती संस्थेत इंजिनीअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेत होता आणि जळगावमध्ये रूम करून राहत होता. त्याचे कुटुंब शेतीवर उदरनिर्वाह करते.
मयताच्या मोठ्या भावाने रितेश पाटील यांनी भावाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. प्रेमप्रकरणाशी संबंधित तक्रारीमुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले असून, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
मयत हितेशच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ रितेश आणि आजी असा परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत