Contact Banner

महायुतीत राष्ट्रवादीला सहा जागांची शक्यता; जागावाटप अंतिम टप्प्यात

 

mahayutit-rashtrawadila-saha-jaganchi-shakyata-jagavatap-antim-tappyat


महायुतीत राष्ट्रवादीला सहा जागांची शक्यता; जागावाटप अंतिम टप्प्यात

जळगाव लेवाजगत न्यूज  प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महायुती होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा देण्यावर प्राथमिक सहमती होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. महायुतीची जागावाटप प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून, उमेदवारांची अधिकृत यादी ३० डिसेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि शिवसेना यांना प्रत्येकी तीन जागा कमी मिळण्याची शक्यता असून त्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला संधी दिली जाणार आहे. या बदलामुळे महायुतीत राष्ट्रवादीची भूमिका अधिक भक्कम होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

रात्री उशिरापर्यंत बैठक

शुक्रवारी रात्री सुमारे दहा वाजेपर्यंत भाजपच्या निवड समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल ३२ संभाव्य उमेदवारांच्या नावांवर सखोल चर्चा झाली. भाजपच्या कोअर टीमने प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्रपणे आढावा घेतला. निवडणूक जिंकण्याची क्षमता, स्थानिक राजकीय व सामाजिक समीकरणे, सामाजिक समतोल तसेच उमेदवाराची प्रतिमा या निकषांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.

महायुतीचे संभाव्य जागावाटप

प्राथमिक चर्चेनुसार महायुतीत भाजपला ४७, शिवसेनेला २२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नसून शेवटच्या क्षणी काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाराजीनाट्याची शक्यता

जागावाटपात फेरबदल झाल्यास काही इच्छुक उमेदवार नाराज होण्याची शक्यता आहे. तथापि, महायुतीतील वरिष्ठ नेते नाराजांची समजूत काढण्यासाठी प्रयत्नशील असून, बंडखोरी टाळण्यासाठी समन्वयाची भूमिका घेतली जात आहे.

आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

महापालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांत उमेदवारी निश्चित करण्यासाठी घाई सुरू आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, आजचा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.