Contact Banner

“मार्किंगपेक्षा जास्त झाडे तोडली का? भुसावळ–आमोदा रस्त्यावर वृक्षतोडीवर संशय”

 

markingpeksha-jast-zade-todli-ka-bhusawal-amoda-rastyavar-vrukshatodivar-sanshay


“मार्किंगपेक्षा जास्त झाडे तोडली का? भुसावळ–आमोदा रस्त्यावर वृक्षतोडीवर संशय”

लेवाजगत न्यूज सावदा प्रतिनिधी:- भुसावळ शहराजवळील तापी नदी पुलापासून व्हायब्रेट कम्युनिटी अंतर्गत सुरू असलेल्या भुसावळ ते मधुकर सहकारी साखर कारखाना चौफुली दरम्यानच्या भुसावळ–अकलुद–पाडळसा–बामनोद-आमोदा रस्त्याच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणावर महाकाय वृक्षांची सर्रास कत्तल होत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली, प्रत्यक्षात रस्त्याला अडथळा नसलेली झाडे तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर उभी असलेली जुनी, घनदाट व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची झाडेही तोडली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.


हा व्हिडीओ पहा -भुसावळ–अकलूद–पाडळसा–बामनोद-आमोदा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली महाकाय वृक्षांची सर्रास कत्तल

https://youtu.be/0ircYReZedo

विशेष म्हणजे ही वृक्षतोड सर्रासपणे मशीनने कापून जेसीबीच्या साहाय्याने उचलून केली जात असून, कोणतीही लपवाछपवी न करता दिवसाढवळ्या नागरिकांच्या डोळ्यासमोर हे प्रकार सुरू आहेत. तोडलेले महाकाय वृक्ष जेसीबीने थेट ट्रॅक्टरमध्ये भरून पाडळसा, रावेर व रसलपूर परिसराकडे नेले जात असल्याचे मजुरांनी सांगितले आहे.

रस्ता रुंदीकरणाला अडथळा नसतानाही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने शेतकरी, पर्यावरणप्रेमी व प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणात वन विभाग यांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा असून, वृक्षतोडीसाठी आवश्यक परवानग्या, पंचनामे व पर्यावरणीय नियमांचे पालन झाले आहे की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्त्वाचे म्हणजे, या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने अधिकृतपणे मार्किंग केलेल्या झाडांव्यतिरिक्त इतर झाडे तोडली आहेत का, याची तातडीने चौकशी करून स्थळ पंचनामा करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. प्रत्यक्षात किती झाडांना परवानगी होती व प्रत्यक्षात किती झाडे तोडण्यात आली, याची स्पष्ट नोंद करून दोषी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सुरू असलेली ही वृक्षतोड तात्काळ थांबवावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वन विभागाने सखोल चौकशी करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. याचबरोबर या प्रकरणाकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी कटाक्षाने लक्ष देऊन संबंधित यंत्रणांना तात्काळ कारवाईचे आदेश द्यावेत, अशी ठाम मागणी नागरिक, शेतकरी व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.