Contact Banner

सावदा–लहान वाघोदा सावदा रेल्वे स्थानक मार्गावर खडी उघडी; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा प्रवास धोक्यात

 सावदा–लहान वाघोदा सावदा रेल्वे स्थानक मार्गावर खडी उघडी; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा प्रवास धोक्यात

लेवाजगत न्युज सावदा:- लहान वाघोदा ते सावदा रेल्वे स्थानक कडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची अवस्था गेल्या एक महिन्यापासून अतिशय दयनीय झाली असून, निवडणुकीपूर्वी घाईघाईत टाकलेली खडी व त्यावर वरच्यावर टाकलेले डांबर रहदारीमुळे पूर्णपणे उघडे पडले आहे. परिणामी संपूर्ण रस्ता खडीने भरलेला असून, वाहनचालकांसह पायी चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

हा मार्ग मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दररोज या रस्त्यावरून बसेस, ट्रक, चारचाकी वाहने तसेच मोठ्या संख्येने दुचाकीस्वार ये-जा करतात. सातत्याने होणाऱ्या जड व हलक्या वाहतुकीमुळे खडी सैल होऊन रस्त्यावर पसरली असून, दुचाकी घसरून पडण्याचे व अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत.

सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावे या रस्त्याच्या पुढे असल्याने ग्रामीण भागाचा शहराशी संपर्क याच मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी, कामगार व ग्रामीण नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ या मार्गावर असते.

या रस्त्यावर सावदा पोलीस स्टेशन, सावदा रेल्वे स्थानक, गुरांचा दवाखाना, नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या विद्यामंदिर, श्री आ गं हायस्कुल, सब-रजिस्ट्रार कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालय असल्याने दिवसभर विद्यार्थी, रुग्ण, पालक व सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. विशेषतः शालेय विद्यार्थिनींसाठी या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे झाले असून, खडी व खड्ड्यांमुळे शाळेत जाणे कठीण झाल्याची भावना विद्यार्थिनी व्यक्त करीत आहेत.

रस्त्याला साईडपट्ट्यांचा अभाव असल्याने पायी चालणाऱ्यांची वर्दळ अधिक धोकादायक ठरत आहे. सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत अपघाताची शक्यता वाढत असून, किरकोळ अपघात वारंवार घडत असतानाही संबंधित यंत्रणेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

निवडणुकीपूर्वी करण्यात आलेले तात्पुरते व निकृष्ट डांबरीकरण टिकाऊ ठरले नसल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून रस्त्यावरील खडी हटवावी व दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. तसेच मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालून संबंधित विभागाला तात्काळ आदेश द्यावेत, अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा विद्यार्थ्यांसह नागरिकांकडून दिला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.