Contact Banner

वंदे मातरम @१५० दिनदर्शिकेचे ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते जळगावमध्ये दिमाखदार प्रकाशन

 

vande-mataram-150-dindarshikeche-na-girish-mahajan-yancha-haste-jalgaonmadhe-dimakhdar-prakashan


वंदे मातरम @१५० दिनदर्शिकेचे ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते जळगावमध्ये दिमाखदार प्रकाशन

लेवाजगत न्यूज जळगाव :भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या आणि देशभक्तीची भावना जागवणाऱ्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रमंत्राला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक औचित्याने, भाजप जळगाव जिल्हा पूर्वच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकीताई पाटील यांनी निर्मित केलेल्या ‘वंदे मातरम @१५०’ या विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे ग्रामविकास व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जळगाव येथील जी.एम. फाउंडेशन येथे शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ना. गिरीश महाजन (राज्य मंत्री – ग्रामविकास व आपत्ती व्यवस्थापन),राजू मामा भोळे (आमदार),मंगेश दादा चव्हाण (आमदार),डॉ. राजेंद्रजी फडके (ज्येष्ठ विचारवंत),नितीनजी लढा (माजी महापौर, जळगाव महानगरपालिका),दीपक सूर्यवंशी (जिल्हाध्यक्ष, भाजप जळगाव महानगर),डॉ. राधेश्याम चौधरी (जिल्हाध्यक्ष, भाजप जळगाव जिल्हा पश्चिम),डॉ. केतकी पाटील (जिल्हा सरचिटणीस, भाजप जळगाव जिल्हा पूर्व),रोहित निकम (उपाध्यक्ष, पणन महासंघ)यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्याला संबोधित करताना ना. गिरीश महाजन म्हणाले की, “वंदे मातरम हे गीत आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करते. देशाच्या प्रगतीसाठी आणि संरक्षणासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची प्रेरणा या राष्ट्रमंत्रातून मिळते.” वंदे मातरमच्या निर्मितीमागील ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्या काळातील परिस्थिती तसेच स्वातंत्र्यलढ्यातील त्याचे महत्त्व या दिनदर्शिकेत प्रभावीपणे मांडण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. “ही दिनदर्शिका प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे आणि ती प्रत्येक कुटुंबासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

वंदे मातरम हे केवळ गीत नसून भारतीयांच्या मनातील ऊर्जा असल्याचे सांगत, स्वातंत्र्यलढ्यात या राष्ट्रमंत्रामुळे जनतेमध्ये स्फुरण निर्माण झाले. या राष्ट्रमंत्राला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने, ही ऊर्जा घराघरात पोहोचावी या उद्देशाने ‘वंदे मातरम @१५०’ या विशेष दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आल्याचे डॉ. केतकी पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जळगाव शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.