पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय पदवी प्रदान सोहळ्यात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन
पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय पदवी प्रदान सोहळ्यात पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन
लेवाजगत न्यूज | जळगाव – “माझ्या वडिलांनी वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर त्यांचे कार्य पुढे सुरू ठेवणार का, असे विचारले. त्यावेळी ‘हो’ म्हणून दिलेला शब्दच माझ्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉईंट ठरला,” असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी केले.
सन २०२० च्या बॅचचा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. मंदाकीनी आमटे, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, डीन डॉ. प्रशांत सोळंके, वैद्यकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी पदवी प्रदान सोहळ्याची घोषणा करून शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकीनी आमटे यांची उपस्थिती लाभणे ही २०२० च्या बॅचसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात आरोग्य सेवेची नितांत गरज – डॉ. मंदाकीनी आमटे
“प्रेम, त्याग आणि करूणेने रुग्णांची सेवा करणे आवश्यक आहे. पदवी हा आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. पुढे अनेक पदव्या मिळाल्या तरी पहिल्या पदवीचे स्थान वेगळे असते. ती मिरवण्यासाठी नसून जबाबदारीची जाणीव करून देणारी असते. ग्रामीण भागात आजही वैद्यकीय सेवेची मोठी गरज आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मोठ्या शहरांकडे वळण्याऐवजी किमान एक-दोन वर्षे ग्रामीण भागात सेवा द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
प्रामाणिक वैद्यकीय तत्त्वांचे पालन करा – पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे
दीक्षांत समारंभात १५२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. ग्रामीण भागातील गरीबी आणि आरोग्य सुविधांची कमतरता लक्षात घेता विद्यार्थ्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. “हृदयात देश आणि नजरेत रुग्ण ठेवून वैद्यकीय तत्त्वांचे प्रामाणिक पालन करा,” असा संदेश त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी आपल्या जीवनप्रवासाचे अनुभव कथन केले. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे वडील बाबा आमटे यांच्या कार्याचा वसा पुढे नेत त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि आदिवासी सेवेत उल्लेखनीय कार्य केले आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात संशोधन आणि सेवेचा ठसा उमटवला आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
१५२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
या समारंभात १५२ विद्यार्थ्यांना पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपला पाल्य डॉक्टर झाल्याचा आनंद अनेकांच्या डोळ्यांत अश्रू स्वरूपात दिसून आला.
विद्यार्थ्यांपैकी वरूण नन्नवरे, सारा पटेल, अनिरुद्ध टेणपे, श्रुती सिंग, अमित साखरे, बुशरा खान, चिंतन चौधरी तसेच पालकांपैकी गीता कांबळे व नितीन राय यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिरथ बॅचच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रद्धा पाटील, श्रेयन व्यवहारे, नंदिनी ढोरे आणि स्वराज उभाद यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत