रावेर मतदारसंघातील मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवा : आमदार अमोल जावळे
रावेर मतदारसंघातील मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवा : आमदार अमोल जावळे
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी यावल-खरीप पणन हंगाम २०२४–२५ अंतर्गत रावेर–यावल विधानसभा क्षेत्रातील मका उत्पादक शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी राज्याचे सहकार व पणन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन मका खरेदीचे उद्दिष्ट तातडीने वाढविण्याची मागणी केली आहे.
सध्या शासनाच्या किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत मका खरेदी प्रक्रिया सुरू आहे. मात्र, रावेर–यावल मतदारसंघात यावर्षी मका पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. परिणामी, खरेदीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आमदार जावळे यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, खरेदी केंद्रांवरील मर्यादित कोटा, अपुरे उद्दिष्ट आणि वेळापत्रकातील बंधने यामुळे अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहेत. हमीभावाने खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने मका विक्री करावी लागत असून त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर रावेर–यावल विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र वाढीव मका खरेदी उद्दिष्ट मंजूर करणे, खरेदी कालावधी वाढविणे तसेच नोंदणीकृत सर्व पात्र शेतकऱ्यांचा मका हमीभावाने खरेदी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा व मका उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत