Contact Banner

“वीर वाजेकर महाविद्यालयात व्यसनमुक्तीसाठी विद्यार्थ्यांची सामुहिक शपथ”




 “वीर वाजेकर महाविद्यालयात व्यसनमुक्तीसाठी विद्यार्थ्यांची सामुहिक शपथ”


उरण : सुनिल ठाकूर -

रयत शिक्षण संस्थेच्यावीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्रजापिता ब्रह्माकुमारीज, जे.एन.पी.ए. वसाहत शाखेच्या सहकार्याने “व्यसनमुक्त भारत” या विशेष अभियानांतर्गत व्यसनमुक्ती शपथ व राजयोग ध्यान मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.  महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित या कार्यक्रमाला सर्व विद्या शाखांचे  सुमारे ३०० विद्यार्थी विद्यार्थिनी, तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. ब्रह्मकुमारीज संस्थेच्या माताजी संध्या दीदी व त्यांचे सहकारी यांच्या मार्फत आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मा. प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर, उपप्राचार्य प्रा. गजानन चव्हाण व प्रा. डॉ. संदीप घोडके, प्रा. राम गोसावी, प्रा. श्रीकांत गोतपगार, प्रा. प्रांजळ भोईर, प्रा. भूषण ठाकूर यांची उपस्थिती लाभली. प्रजापिता ब्रह्माकुमारीज संस्था “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत देशभरात युवक व विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती करत आहे; यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाशी संस्थेने सामंजस्य करार करून समन्वयाने मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. याच अभियानाच्या अनुषंगाने कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तंबाखू, दारू, ड्रग्ज आदी सर्व प्रकारच्या नशापदार्थांपासून कायम दूर राहण्याची शपथ घ्यायला लावण्यात आली आणि स्वतः व्यसनमुक्त राहून इतरांनाही व्यसनातून बाहेर काढण्याचा संकल्प करायला प्रवृत्त केले. 

सुंदर चरित्रावर आधारलेला व्यसनमुक्त समाज” निर्माण करून, विश्वशांती, नैतिक मूल्यांची पुनर्स्थापना आणि संस्कारवान तरुण घडवणे हा या संस्थेचा उद्देश असल्याचे संध्या दीदी यांनी सांगितले.

राजयोग ध्यानाचे फायदे  मेडिटेशनद्वारे तणावमुक्त, आनंदी जीवन, उच्‍च नीच रक्तदाब व हृदयरोगांपासून आराम, नकारात्मक विचारांपासून मुक्ती, नैराश्य व डिप्रेशनमधून सुटका, मूल्यमूलक शिक्षण व चरित्र निर्मिती, व्यसनांपासून मुक्ती, राग क्रोधावर नियंत्रण, कुटुंबातील सौहार्द, मानसिक ताणातून मुक्ती व स्वास्थ्यपूर्ण जीवन असे अनेक फायदे मिळत असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले.  विद्यार्थ्यांसाठी राजयोगाच्या विशेष लाभ असून  यात परीक्षा भीती कमी होणे, अभ्यासात एकाग्रता वाढणे, मनोबल विकास, स्मरणशक्ती वृद्धी, व्यक्तिमत्त्व घडण, अंतर्गत गुणांचा विकास घडून येतो असे त्या म्हणाल्या. दृश्यश्राव्य नाटिका व विद्यार्थ्यांना संदेश कार्यक्रमात ब्रह्माकुमारीजच्या युवक कार्यकर्त्यांनी व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, कुटुंबातील कलह, आरोग्य हानी व सामाजिक अधःपतन दाखवणारी प्रभावी दृक्श्राव्य नाटिका सादर केली. नाटिकेनंतर घेतलेल्या मार्गदर्शन सत्रात मनातील भीती चिंता दूर करण्याचे, स्वतःची ओळख आत्मस्वरूपात जाणण्याचे आणि “नशा सोडो, जीवन जोड़ो” हा संदेश समाजात पोहोचवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. महाविद्यालयाच्या वतीने प्रभारी  प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारीज संस्थेचे आभार मानत भविष्यातही व्यसनमुक्ती, व्यक्तिमत्त्व विकास व मूल्य शिक्षणाशी निगडित अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.