Contact Banner

कीर्तन सुरू असताना काळाचा घाला; ह.भ.प. श्रीहरी पुरी यांच्या पत्नी व मुलाचा भीषण अपघातात जळून मृत्यू

kirtan-suru-astana-bhishan-apghat-hbp-shrihari-puri-patni-va-mulacha-jalun-mrityu


कीर्तन सुरू असताना काळाचा घाला; ह.भ.प. श्रीहरी पुरी यांच्या पत्नी व मुलाचा भीषण अपघातात जळून मृत्यू

बीड (आष्टी) : रस्त्यावरील बेफाम वेग आणि बेजबाबदार वाहनचालकांमुळे आणखी एक भीषण अपघात घडला असून, या दुर्घटनेत माय-लेकाचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आष्टी तालुक्यातील कापसी फाट्यावर काल (सकाळी सुमारे ११ वाजता) हा थरारक अपघात घडला.

या अपघातात कीर्तनकार ह.भ.प. श्रीहरी महाराज पुरी यांच्या पत्नी पुष्पा श्रीहरी पुरी (वय ४२) आणि मुलगा ऋषिकेश श्रीहरी पुरी (वय २५) यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पा पुरी आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश हे कारने आष्टीहून बीडकडे जात होते. कापसी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परने (क्रमांक MH 16 CD 7305) त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला.

आगीने रौद्ररूप धारण केल्याने गाडीत अडकलेल्या माय-लेकाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, कार पूर्णपणे जळाल्याने आणि चेंदामेंदा झाल्याने मृतदेह बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले. तब्बल दीड ते दोन तासांच्या प्रयत्नांनंतर कटरच्या सहाय्याने गाडीचे पत्रे कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

या घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे, मृत ऋषिकेशचे वडील ह.भ.प. श्रीहरी पुरी हे त्याच वेळी एका ठिकाणी कीर्तनात हरिनामाचा गजर करत होते. कीर्तन सुरू असतानाच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची बातमी समजताच उपस्थित भाविकही स्तब्ध झाले.

या भीषण अपघातानंतर नागरिकांकडून भरधाव आणि नियमभंग करणाऱ्या जड वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.