महादेव हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे यांना ‘वॅलर अवॉर्ड’ मुंबईत राज्यस्तरीय परिषदेत गौरव; संकटकाळातील धैर्यशील सेवेची दखल
महादेव हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे यांना ‘वॅलर अवॉर्ड’
मुंबईत राज्यस्तरीय परिषदेत गौरव; संकटकाळातील धैर्यशील सेवेची दखल
जळगाव : वैद्यकीय क्षेत्रात निस्वार्थ सेवेसाठी ओळखले जाणारे महादेव हॉस्पिटल येथील हाय डिपेन्डसी युनिटप्रमुख व प्रसिद्ध स्त्रीरोग-प्रसूती तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे यांना राज्यस्तरीय प्रतिष्ठित ‘मॉग्स-अमॉग्स वॅलर अवॉर्ड’ (MOGS-AMOGS Valour Award) प्रदान करून गौरविण्यात आले.
मुंबई येथे हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिअट इंटरनॅशनल (सहार) येथे पार पडलेल्या ‘अमॉग्स २०२६’ (AMOGS 2026) या परिषदेत हा सन्मान सोहळा संपन्न झाला. मुंबई ऑब्स्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी (MOGS) आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज (AMOGS) यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार, दि. १४ मार्च रोजी आयोजित ‘स्त्री गौरव’ पुरस्कार सोहळ्यात खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते डॉ. नारखेडे यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत कठीण प्रसंग, आणीबाणीची परिस्थिती तसेच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेदरम्यान धैर्याने आणि शांततेने कार्य करून महिलांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याची दखल घेण्यासाठी ‘टीम मॉग्स २०२५-२६’ तर्फे या विशेष पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.
डॉ. सुधीर नारखेडे यांनी आपल्या दीर्घ वैद्यकीय कारकिर्दीत केवळ रुग्णसेवाच केली नाही, तर संकटसमयी सहकाऱ्यांनाही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले आहे. महिला आरोग्याबाबत त्यांची असलेली बांधिलकी आणि समर्पित सेवा यामुळेच त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. नारखेडे यांच्यावर वैद्यकीय क्षेत्रासह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत