मुंबईत लेवा मंडळाचा महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणारा स्तुत्य उपक्रम
मुंबईत लेवा मंडळाचा महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणारा स्तुत्य उपक्रम
लेवाजगत न्यूज मुंबई : मुंबई व परिसर लेवा मंडळ, मुंबई यांच्या वतीने सायली शाळा मैदान, गोराई रोड, बोरिवली (पश्चिम) येथे दि. 28 मार्च 2026 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 या कालावधीत महिला उद्योजकांसाठी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात महिलांनी बनविलेले उन्हाळी वाळवण पदार्थ, खान्देशी खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तू, कृत्रिम दागिने, बॅग्ज तसेच विविध जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. प्रदर्शनात एकूण 90 स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने सहभागी उद्योजकांचा उत्साह द्विगुणित झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) श्री. रवींद्रजी साठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार मनीषाताई चौधरी (दहिसर), श्री. निळकंठ चौधरी (मॅनेजिंग डायरेक्टर, सनराइज प्रोसेसिंग इक्विपमेंट्स प्रा. लि., बोईसर-तारापूर), श्रीमती ममता यशवंत पाटील (स्वीय सहाय्यक), तसेच ज्येष्ठ समाजसेवक अरुण दादा चौधरी उपस्थित होते.
आपल्या मनोगतात श्री. रवींद्रजी साठे यांनी भारतीय खाद्यसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. “आपले हात – आमची साथ” हे खादी व ग्रामोद्योग विभागाचे ब्रीद असून ‘प्रत्येक हाताला काम’ देण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजकांना अडचणी आल्यास खादी व ग्रामोद्योग विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला माजी शिक्षणमंत्री विनोदजी तावडे यांचे तत्कालीन विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्राची रवींद्र साठे तसेच आमदार संजयजी उपाध्याय (बोरिवली) यांची विशेष उपस्थिती लाभली.
प्रदर्शनातील 3 स्टॉलधारकांना लकी कूपनद्वारे पैठणी भेट देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापन समितीच्या सौ. ललिता पाटील, सौ. उर्मिला धांडे, सौ. लतिका पाटील, सौ. अपर्णा येवले व सौ. भारती नेहेते यांनी विशेष परिश्रम घेतले. कुमारी भार्वी धांडे यांनी तांत्रिक सहाय्य केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. प्रिती लोखंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. लतिका पाटील यांनी केले.
यापुढेही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन संस्थेचे सचिव तथा प्रमुख अतिथी श्री. निळकंठ चौधरी यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत