राज्यातील टपाल व पासपोर्ट कार्यालयांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ईमेल; तपासणी युद्धपातळीवर
राज्यातील टपाल व पासपोर्ट कार्यालयांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ईमेल; तपासणी युद्धपातळीवर
लेवाजगत न्यूज हिंगोली -राज्यातील टपाल तसेच पासपोर्ट कार्यालयांना सायनाइड विषारी वायू मिश्रित आरडीएक्स बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल बुधवारी (दि. २५) प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ईमेलच्या पार्श्वभूमीवर बहुतांश ठिकाणी टपाल कार्यालयांतील कामकाज तात्पुरते बंद करून सखोल तपासणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. संबंधित ईमेल कोणत्या भागातून पाठविण्यात आला याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध टपाल कार्यालयांना प्राप्त झालेल्या ईमेलमध्ये “दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी राज्यातील सर्व पासपोर्ट व टपाल कार्यालयांमध्ये सायनाइड विषारी वायू मिश्रित १६ आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असून तात्काळ सर्वांना बाहेर काढा,” असा इशारा देण्यात आला होता. या संदेशामुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून अनेक ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. विशेषतः पासपोर्ट कार्यालये आणि टपाल विभागातील पार्सल विभागांची काटेकोर तपासणी केली जात आहे. राज्यभरात खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी सुरू असल्याची माहिती हिंगोलीचे पोस्टमास्तर एस. एस. निर्मल यांनी दिली.
हिंगोली येथे माहिती मिळताच पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, पोलिस निरीक्षक संदीप मोदे यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने पोस्ट ऑफिस परिसराची सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत