सावद्यात गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्रा; ग्रामप्रदक्षिणेची जय्यत तयारी, नागरिकांना रांगोळीने मार्ग सजवण्याचे आवाहन
सावद्यात गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्रा; ग्रामप्रदक्षिणेची जय्यत तयारी, नागरिकांना रांगोळीने मार्ग सजवण्याचे आवाहन
लेवाजगत न्यूज सावदा : गुडीपाडवा व नूतन वर्ष निमित्त सावदा शहरात यंदा भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, श्री स्वामीनारायण मंदिर यांच्या वतीने विशेष गुढीपाडवा उत्सव व शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुढीपाडवा या सणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून, भाविकांमध्ये याबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजता मंदिरापासून या भव्य शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. पारंपरिक पद्धतीने आयोजित करण्यात आलेली ही ग्रामप्रदक्षिणा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे.
ही शोभायात्रा श्री स्वामीनारायण मंदिर येथून सुरू होऊन मोठा आड, इंदिरा गांधी चौक, धर्मवीर संभाजी महाराज चौक, गांधी चौक, गवत बाजार, शारदा चौक, रविवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वंजारवाडी,कॉर्नर रोड, सुभाष चौक मार्गाने फिरून पुन्हा मंदिरात येऊन समाप्त होणार आहे.
या शोभायात्रेत मंदिराचे मान्यवर संत उपस्थित राहणार असून त्यामध्ये कोठारी स्वयंप्रकाश दासजी शास्त्री, विश्वप्रकाश दासजी शास्त्री, भक्तीप्रिय दासजी शास्त्री आणि अनंत प्रकाश दासजी शास्त्री ,भंडारी माधव स्वामी यांचा समावेश आहे. त्यांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरण अधिक भक्तिमय होणार आहे.
शोभायात्रा ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावरील नागरिकांनी सकाळी आपल्या घरासमोर तसेच परिसरात आकर्षक रांगोळी काढून मार्ग सुशोभित करावा, तसेच या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टीतर्फे करण्यात आले आहे.
यासोबतच महिलांनी व पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
गुढीपाडवा निमित्त आयोजित या भव्य शोभायात्रेमुळे सावदा शहरात उत्साह, आनंद आणि भक्तीमय वातावरण निर्माण होणार असून, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत