सोशल मीडियावर ‘गुडबाय’ म्हणत १८ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या जळगाव शहरातील शासकीय वसतिगृहातील दुर्दैवी घटना; कारण अस्पष्ट
सोशल मीडियावर ‘गुडबाय’ म्हणत १८ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
जळगाव शहरातील शासकीय वसतिगृहातील दुर्दैवी घटना; कारण अस्पष्ट
जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या १८ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूपूर्वी संबंधित विद्यार्थ्याने सोशल मीडियावर “मी माझं आयडी बंद करत आहे… गुडबाय” असा संदेश पोस्ट केल्याने या घटनेला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.
मृत विद्यार्थी रोहित समाधान पवार (वय १८, रा. निंभोरा, ता. धरणगाव) असे असून तो आयटीआयमध्ये ‘मशिनिष्ट’ ट्रेडच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. तो शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास रोहित आपल्या रूममध्ये एकटाच होता. त्याचे रूममेट्स कॉलेजला गेले होते. याच दरम्यान त्याने खोलीतील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळानंतर मित्र परतल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले. वारंवार आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला. अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर रोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
मित्रांनी तत्काळ त्याला खाली उतरवून रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे वसतिगृह परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीती व हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी रोहितने इन्स्टाग्रामवर “हॅलो मित्रांनो, माफ करा… मी माझं आयडी कायमचं बंद करत आहे… गुडबाय” असा भावनिक संदेश पोस्ट केला होता. हा संदेश त्याचा शेवटचा ठरला. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार मानसिक तणावाची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच समाजकल्याण विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वसतिगृहासाठी पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत