डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात नेत्रतज्ज्ञांच्या टीमने रचला इतिहास तिरळेपणा विकाराच्या १३१ शस्त्रक्रिया यशस्वी ; रूग्णांच्या चेहर्यावर फुलला आनंद
डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात नेत्रतज्ज्ञांच्या टीमने रचला इतिहास
तिरळेपणा विकाराच्या १३१ शस्त्रक्रिया यशस्वी ; रूग्णांच्या चेहर्यावर फुलला आनंद
लेवाजगत न्यूज जळगाव : तिरळेपणा या नेत्रविकारावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार मिळावेत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही शस्त्रक्रियेची संधी मिळावी या उद्देशाने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात अवघ्या दोन दिवसांत तब्बल १३१ तिरळेपणावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्रसेवेच्या क्षेत्रात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयाने नवा इतिहास रचला आहे.
पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान आणि डॉ. उल्हास पाटील रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या रुग्णांची मोफत तपासणी करून पात्र रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.या शिबिरासाठी पुण्याचे प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २० जणांच्या तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञांच्या टीमने सहभाग घेतला. या टीममध्ये नेत्ररोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ, तसेच नर्सिंग कर्मचारी यांचा समावेश होता.
शिबीरात १४३ रूग्णांची सखोल तपासणी
शिबिराच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १४३ हून अधिक रुग्णांची सविस्तर तपासणी करण्यात आली. त्यापैकी शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या ६८ रूग्णांवर दोन दिवसांत १३१ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तिरळेपणा हा डोळ्यांच्या स्नायूंशी संबंधित विकार असून त्यामध्ये दोन्ही डोळे एकाच दिशेने न पाहता वेगवेगळ्या दिशांना वळलेले दिसतात. यामुळे रुग्णांच्या दृष्टीवर परिणाम होतो तसेच आत्मविश्वासावरही परिणाम होऊ शकतो. या विकारावर वेळेत उपचार आणि योग्य शस्त्रक्रिया केल्यास डोळ्यांची स्थिती सुधारता येते व रुग्णांना सामान्य दृष्टी मिळू शकते.शिबिरात आलेल्या अनेक लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत विविध वयोगटातील रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अत्याधुनिक उपकरणे, अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ यांच्या मदतीने या सर्व शस्त्रक्रिया सुरक्षित आणि यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या.
या तज्ज्ञांनी केल्या शस्त्रक्रिया
नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. ललीत शाह, डॉ. राजेश पवार, डॉ. राजेंद्र लाहोरे, डॉ. रमेश भांगे, डॉ. अमोल वलझाडे, डॉ. नितीन भालेराव, डॉ. मनोज भायगुडे, डॉ. संजीव राठोड, डॉ. गौरव राठोड, डॉ. सचिन गडे, डॉ. गणेश बांदल, डॉ. सतीश देसाई, डॉ. उदय कुरूदकर, डॉ. वैभव वनारसे, डॉ. शामकांत कुळकर्णी, डॉ. अनिल वायकुले, डॉ. मयूर लांडे यांनी शस्त्रक्रिया केल्या. शिबीरासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील नेत्र विभागप्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. निखील चौधरी, डॉ. नितु पाटील, डॉ. रेणूका पाटील, डॉ. मयूरी निलावाड, डॉ. अभिजीत काकड, डॉ. नेहा नारखेडे, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. जतीन बाविस्कर, डॉ. शुभम भारसाके, डॉ. गौरव पाटील, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रीया गोरे, डॉ. वैष्णव व्यवहारे, डॉ. अश्विनी काकडे, डॉ. अनिश कडलगावकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, यांनी सहकार्य केले.
नेत्रविभागातील तज्ज्ञांचे विशेष परिश्रम
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील नेत्ररोग विभागातील डॉक्टरांनीही या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. शिबिराच्या नियोजनापासून तपासणी, शस्त्रक्रिया आणि रुग्णांच्या देखभालीपर्यंत सर्व प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.
कुटुंबियांकडून कृतज्ञता
शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आर्थिक अडचणींमुळे शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याने अनेक कुटुंबे चिंतेत होती. मात्र या मोफत शिबिरामुळे त्यांच्या मुलांना आणि कुटुंबीयांना नव्या आशेचा किरण मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील अनेक रुग्ण तिरळेपणासारख्या विकाराकडे दुर्लक्ष करतात किंवा आर्थिक अडचणींमुळे उपचार घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा मोफत शिबिरांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळतो. योग्य वेळी निदान आणि शस्त्रक्रिया केल्यास रुग्णांचे आयुष्य अधिक चांगले होऊ शकते.
- डॉ. उल्हास पाटील, अध्यक्ष गोदावरी फाउंडेशन
तिरळेपणा हा पूर्णपणे उपचारयोग्य विकार आहे. अनेक वेळा पालक किंवा रुग्ण त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मात्र योग्य वेळी शस्त्रक्रिया केल्यास रुग्णांचे डोळे सरळ होऊ शकतात आणि त्यांची दृष्टी सुधारते. जळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर हे शिबीर आयोजित करण्यात आले हे कौतुकास्पद आहे.
-डॉ. मधुसूदन झंवर, नेत्रतज्ज्ञ, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान
समाजातील गरजू रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचा मुख्य उद्देश आहे. भविष्यातही अशा प्रकारचे विविध आरोग्य शिबिरे आयोजित करून अधिकाधिक रुग्णांना उपचाराची संधी देण्यात येणार आहे.
- डॉ. एन.एस. आर्विकर, नेत्र विभागप्रमुख, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत