Contact Banner

खरीप हंगाम २०२६ : जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

kharip-hangam-2026-jalgaon-jilhyat-urea-khatanchi-pahili-rek-dakhal



खरीप हंगाम २०२६ : जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल


लेवाजगत न्यूज जळगाव, दि.9 एप्रिल – खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन करण्यात येत असून जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल झाली आहे.


सदर रेकद्वारे जिल्ह्यासाठी एकूण २६५० मेट्रिक टन युरिया खत प्राप्त झाले असून हा पुरवठा राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) कंपनीमार्फत करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली तसेच कंपनी प्रतिनिधी, वाहतूकदार व हमाल प्रतिनिधींशी संवाद साधून उतरवणूक व वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला.


खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व विक्रेत्यांनी खतांची विक्री रिअल-टाईम सेल प्रणालीद्वारे तसेच आधार संलग्न e-POS यंत्रणेद्वारेच करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच खतांची साठवणूक, वाहतूक व विक्री प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना यावेळी देण्यात आल्या.


खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक ते खत वेळेत, रास्त दरात व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने नियोजन व पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही यावेळी संबंधितांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.