Contact Banner

लेवा पाटील समाज मंडळाच्या प्रगतीसाठी नवे संकल्प; सामाजिक उपक्रमांना पुन्हा गती देण्याची घोषणा

 

leva-patil-samaj-mandal-pragati-nave-sankalp-samajik-upakram-gati


भव्य पदग्रहण सोहळ्यात नव्या युगाची सुरुवात; प्रा. डॉ. गुणवंत भंगाळे सर


लेवा पाटील समाज मंडळाच्या प्रगतीसाठी नवे संकल्प; सामाजिक उपक्रमांना पुन्हा गती देण्याची घोषणा

 

लेवा जागत प्रतिनिधी खेमचंद पाटील,  मुंबई-  अंबरनाथ शहरातील प्रतिष्ठित, सुशिक्षित आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लेवा पाटीदार समाजाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून लेवा पाटील समाज मंडळ, अंबरनाथ यांच्या नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. समाजबांधवांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने समाजात नवचैतन्य संचारले.

                दि. २४ जानेवारी रोजी मंडळाच्या मुख्य कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा संस्थापक विश्वस्त श्री. वसंत होले यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थापक श्री. सोपान इंगळे यांच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. त्यानुसार दि. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२९ या कालावधीसाठी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

              या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. डॉ. गुणवंत प्रेमराज भंगाळे यांचा पुष्पगुच्छ, शाल व सत्कारचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच मावळते अध्यक्ष श्री. एकनाथ रामू चौधरी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. निलिमा रडे यांचाही गौरव करण्यात आला.

             कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व प्रास्ताविक मंडळाचे कार्यवाह श्री. राजेंद्र झोपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपकार्यवाह श्री. पंकज नारखेडे यांनी केले.

               समारंभाला लेवा युथ फोरमचे अध्यक्ष श्री. उमेश पाटील, भोरगाव लेवा पंचायत मुंबई विभाग प्रमुख श्री. मयुरेश कोल्हे, लेवा स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख किरण नेमाडे, तसेच लेवा व्यवसायिक मंडळ प्रमुख हर्षदा नेमाडे यांची विशेष उपस्थिती लाभली.

          यावेळी संस्थापक विश्वस्त श्री. वसंत होले यांनी मंडळाच्या स्थापनेपासूनचा प्रेरणादायी इतिहास उलगडताना समाजाच्या एकजुटीमुळे मंडळाची वाटचाल अधिक सक्षम झाली असल्याचे सांगितले. अनेक अडचणींवर मात करत मंडळासाठी १० हजार चौरस फूट जागा खरेदी करण्यात आली, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रा. डॉ. गुणवंत भंगाळे यांनी समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार मानत, “मंडळाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि पारदर्शकतेने कार्य करू. समाजासाठी सुसज्ज व आधुनिक सभागृह उभारण्याचा आमचा संकल्प आहे,” असे ठामपणे सांगितले. तसेच समाजातील ऐक्य, शिस्त, संयम आणि सहकार्य या मूल्यांवर भर देत विविध सामाजिक उपक्रमांना नव्याने गती देण्याची घोषणा केली.

समारोपानंतर सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. या भव्य, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक पदग्रहण सोहळ्यामुळे लेवा पाटीदार समाजात नव्या पर्वाची आशादायी सुरुवात झाली, अशी भावना उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.