Contact Banner

२४ तासांच्या अखंड कोडिंगमधून नवकल्पनांचा जल्लोष; गोदावरी हॅकॅथॉन १.० उत्साहात संपन्न

 

24-hour-coding-innovation-celebration-godavari-hackathon-1-concludes-successfully

२४ तासांच्या अखंड कोडिंगमधून नवकल्पनांचा जल्लोष; गोदावरी हॅकॅथॉन १.० उत्साहात संपन्न

लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशनच्या येथे १४ ते १५ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेला “गोदावरी हॅकॅथॉन १.०” हा राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन महाउत्साहात संपन्न झाला. “Innovation to Impact” या संकल्पनेवर आधारित २४ तासांच्या अखंड कोडिंग स्पर्धेत देशभरातील तरुण अभियंत्यांनी सहभाग घेत नाविन्यपूर्ण तांत्रिक उपाय सादर करत नवकल्पनांचा अनोखा महाउत्सव साकारला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमित लढ्ढा (लढ्ढा मॅथेमॅटिकल अकॅडमी), डॉ. नवीन खंदारे (सीईओ, केबीसीएनएमयू सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस - केसीसीआयएल) तसेच सागर पाटील (डायरेक्टर, काईट फोरम) उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा, डॉ. हेमंत इंगळे, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. प्रस्तावनेत डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांनी हॅकॅथॉनच्या उद्देशांवर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी जळगावसारख्या भागात नवकल्पना, संशोधन आणि स्टार्टअप संस्कृती विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.

सागर पाटील यांनी काईट फोरममार्फत स्टार्टअप्सना मिळणाऱ्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, मेंटॉरशिप व विविध सहाय्य योजनांची माहिती दिली. तर डॉ. नवीन खंदारे यांनी केसीसीआयएलच्या माध्यमातून १६५ हून अधिक स्टार्टअप्सना सहाय्य केल्याचे सांगत विद्यार्थ्यांना स्टार्टअप उभारणीसंदर्भात मार्गदर्शन केले. या हॅकॅथॉनसाठी १०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. निवड प्रक्रियेनंतर १० संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आणि एकूण ३९ विद्यार्थ्यांनी २४ तासांच्या स्पर्धेत सहभाग घेतला.

स्पर्धेत स्मार्ट सिटी, हेल्थकेअर, कृषी आणि शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर आधारित तांत्रिक उपाय विकसित करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअॅप आधारित नागरिक तक्रार निवारण प्रणाली, १०८ ॲम्ब्युलन्स सेवेसाठी जलद रूटिंग अल्गोरिदम, शेतकऱ्यांसाठी डिजिटल मार्केटप्लेस तसेच ग्रामीण शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली यांसारख्या अभिनव प्रकल्पांवर काम केले. या हॅकॅथॉनमुळे विद्यार्थ्यांना २४ तासांचा इंटेन्स कोडिंग अनुभव, इंडस्ट्री मेंटॉरशिप, प्रत्यक्ष समस्यांवर काम करण्याची संधी आणि तज्ज्ञ परीक्षकांसमोर सादरीकरण करण्याचा अनुभव मिळाला.

स्पर्धेत प्रथम क्रमांक टीम “एथर लॅब”ने पटकावला. या संघात अथर्व चौरसिया, दामिनी देशमुख, भावेश पाटील आणि अनन्या जाधव यांचा समावेश होता. हा संघ येथील होता. द्वितीय क्रमांक “कोड स्टॉर्म” संघाने मिळवला. गौरव पाटील, सानिका कासार, भूषण घोडके आणि केतन पाटील या विद्यार्थ्यांचा या संघात समावेश होता. तृतीय क्रमांक “अँग्री मित्र” संघाने पटकावला. आदिती कदम, आर्या नाटे, वंश पांडे आणि अंशुल नागपूर हे विद्यार्थी या संघात होते. हा संघ येथील होता. विजेत्या संघांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि ५ हजार रुपयांची रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.

समारोपप्रसंगी परीक्षक व पर्यवेक्षक अजिंक्य तोतला तसेच आशुतोष रंगा उपस्थित होते. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, टीमवर्क आणि तांत्रिक कौशल्याचे विशेष कौतुक केले. “Innovate, Build, Impact” या संदेशासह आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या तांत्रिक क्षमतांना वाव देणारा, स्टार्टअप संस्कृतीला चालना देणारा आणि नवभारत घडवणाऱ्या युवा शक्तीचा प्रेरणादायी उत्सव ठरला.

यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डिंकी शदानी, सानिका कासार, हर्षा धांडे आणि तरन्नुम पिंजारी या विद्यार्थिनींनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.