Contact Banner

कळंबूसरे येथील वादळी पावसातील नुकसानग्रस्त अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत महसूल विभागाने पंचनामे करूनही वर्षभरानंतरही भरपाई नाही; नागरिकांमध्ये संताप

kalambusare-storm-damage-victims-still-waiting-for-compensation-after-one-year


कळंबूसरे येथील वादळी पावसातील नुकसानग्रस्त अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत

महसूल विभागाने पंचनामे करूनही वर्षभरानंतरही भरपाई नाही; नागरिकांमध्ये संताप

उरण, प्रतिनिधी : 

उरण तालुक्यातील कळंबूसरे गावासह चिरनेर, सारडे आणि वशेणी परिसरातील वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आजही शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. 26 मे 2025 रोजी पहाटेच्या सुमारास आलेल्या वादळी पावसाने आणि सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक घरांचे मोठे नुकसान केले होते. या घटनेला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असताना देखील नुकसानग्रस्तांना अद्याप कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

26 मे 2025 रोजी सकाळी सुमारे 6 वाजता अचानक आलेल्या वादळी पावसामुळे कळंबूसरे गावातील सुमारे 80 ते 85 घरांची छपरे उडाली होती. काही घरांच्या भिंती कोसळल्या, तर अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. घरांतील विद्युत उपकरणे, कपडे, अन्नधान्य, बेड आणि इतर साहित्यही खराब झाले होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते.

घटनेनंतर कोप्रोली मंडळ अधिकारी के. डी. मोहिते आणि संबंधित तलाठ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे केले होते. त्यानंतर संबंधित अहवाल उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्या कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, पंचनामे होऊनही नुकसानग्रस्तांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही.

पावसाळा तोंडावर आल्याने अनेक नागरिकांनी कर्ज काढून, नातेवाईक आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने स्वतःच्या खर्चातून घरांची दुरुस्ती केली. काहींनी चार-पाच दिवसांतच उडालेली छपरे पुन्हा बसवून कुटुंबाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाने केलेले पंचनामे आणि दिलेली आश्वासने प्रत्यक्षात मदतीत रूपांतरित झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

नुकसानग्रस्तांच्या मते, महसूल विभागाने केलेले पंचनामे आजही शासकीय दप्तरदिरंगाईत अडकून पडले आहेत. वर्षभराचा कालावधी उलटून गेल्यानंतरही नुकसानभरपाई न मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, पुन्हा एकदा पावसाळा सुरू होण्यास अवघा काही दिवसांचा कालावधी शिल्लक असताना देखील या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

प्रतिक्रिया

"वादळी पावसात आमच्या घरांचे मोठे नुकसान झाले होते. महसूल विभागाने पंचनामे केले, मात्र त्यानंतर कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. तहसील कार्यालयात अनेकदा चौकशी करूनही केवळ आश्वासनेच मिळाली. वर्षभर उलटूनही शासनाकडून मदत न मिळाल्याने नुकसानग्रस्त कुटुंबे अजूनही प्रतीक्षेत आहेत."

मनोज पाटील, नुकसानग्रस्त, कळंबूसरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.